औरंगाबादमध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे मुद्रा लोन मिळविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 06:26 PM2019-03-04T18:26:47+5:302019-03-04T18:27:21+5:30
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आरोपी महेश शिंदे याने मुद्रा लोन साठी फाईल दाखल केली होती.
औरंगाबाद: बनावट कागदपत्रे सादर करून बँकेकडून मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.
महेश आसाराम शिंदे (वय २५,रा. लोकशाही कॉलनी, जयभवानीनगर) आणि सिद्धार्थ ठोकळ(रा. पुंडलिकनगर) अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर रस्त्यावरील युनियन बँक आॅफ इंडियामध्ये आरोपी महेश शिंदे याने मुद्रा लोन साठी फाईल दाखल केली होती. ५ फेब्रुवारी रोजी बँकेचे व्यवस्थापक तपनकुमार श्रीरामनंदन प्रसाद हे त्यांच्या कार्यालयात काम करीत असताना दोन्ही आरोपी तेथे आले. त्यावेळी सिद्धार्थ ठोकळने यांनी प्रसाद यांना धमकावत महेश शिंदे यांच्या मुद्रा लोनची फाईल का मंजूर करीत नाही?असे विचारले. तेव्हा महेश यांची फाईल अद्याप माझ्यापर्यंत आली नाही, तुम्ही उद्या या मी चौकशी करून तुम्हाला सांगतो असे प्रसाद यांनी त्यांना सांगितले.
१२ फेब्रुवारी रोजी ठोकळ हा महेश यांची कर्जाची फाईल घेऊन बँक व्यवस्थापक प्रसाद यांच्या केबिनमध्ये आला. तेव्हा त्यांनी ती फाईल घेतली. १५ फेब्रुवारी रोजी प्रसाद यांनी अन्य बँक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन महेशच्या फाईलमधील कागदपत्रानुसार पडताळणी सुरू केली. तेव्हा महेशने दिलेल्या पत्त्यावर त्याचे संत रोहिदास फुट वेअर नावाचे दुकान अस्तित्वात नसल्याचे दिसले. तेथे केवळ घर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नंतर त्यांनी फाईलमधील कागदपत्रात जाधववाडी नवा मोंढा येथील चंद्रा ट्रेडर्स चे कोटेशन दिसले.या दुकानमालकाची बँक अधिकाऱ्यांनी भेट घेतली तेव्हा त्यांनी महेश शिंदे नावाच्या व्यक्तीला त्यांनी कोटेशन दिले नाही. त्यावरील स्वाक्षरी त्यांची नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
एवढेच नव्हे तर महेशच्या फाईलमध्ये असलेले कोटेशन हे सर्वसाधारण ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलाप्रमाणे आहे. त्या बिलावर जीएसटी क्रमांक असतो. त्यांच्या दुकानातील कोऱ्या कोटेशनची फोटोकॉपी घेऊन कलर प्रिंट काढून त्यावर दुकानातील वस्तूंचे विवरण आणि दर नमूद केले असल्याचे सांगितले. कर्ज घेण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे लक्षात येताच प्रसाद यांनी ३ मार्च रोजी बँकेच्यावतीने पुंडलिकनगर ठाण्यात आरोपींविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदविली.