मास्कप्रकरणी याचिका दाखल करून न्यायालयीन सक्रियता वाढविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:05 AM2021-03-27T04:05:17+5:302021-03-27T04:05:17+5:30
औरंगाबाद : सध्या कोरोनाचा काळ चालू आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारला जात आहे. या रकमेचे काय करणार, ही ...
औरंगाबाद : सध्या कोरोनाचा काळ चालू आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारला जात आहे. या रकमेचे काय करणार, ही रक्कम कुठे वापरणार, मास्क वापरत नाहीत, त्यांना ते उपलब्ध करून देणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत आम्ही यासंदर्भात याचिका दाखल केली. हा न्यायालयाची सक्रियता वाढविण्याचाच प्रयत्न होय, असे शुक्रवारी देवगिरी महाविद्यालयाच्या फुले - शाहू - आंबेडकर व्याख्यानमालेत प्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले.
या ऑनलाइन व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी ॲड. सुखदेव शेळके होते. ‘न्यायालयाची सक्रियता व परिवर्तन’ या विषयावर ॲड. सरोदे यांनी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले.
व्याख्यानमालेचे समन्वयक देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी प्रास्ताविक केले.
सरोदे म्हणाले की, न्यायालयाने अन्याय बघत बसायचे का, तशी त्यांची भूमिका नसते आणि नसावी. न्यायालयांनी वैचारिक जीर्णोद्धार आणि पुरोगामी सक्रियता दाखवण्याची गरज आहे. न्यायालयाच्या सक्रियतेसाठी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या कृष्णा अय्यर यांच्यासह अनेक न्यायमूर्तींच्या नावांचा उल्लेख करीत सरोदे यांनी विविध न्यायनिवाड्यांचे दाखले यावेळी दिले.
एक सामान्य नागरिक म्हणून प्रत्येकाने जागरूक राहायला हवे, कायदा व नियमांपासून पलायन करता कामा नये. न्याय मागण्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने न्याय मागितला तर तो मिळेलच याची खात्री नसते हेही सरोदे यांनी सांगितले.