ऐतिहासिक तोफा भंगारात विकण्याचा प्रयत्न
By Admin | Published: May 27, 2017 11:48 PM2017-05-27T23:48:07+5:302017-05-27T23:49:45+5:30
परंडा : शहरातील ऐतिहासिक किल्ल्यातील एक प्राचीन तोफ भंगारात विकण्याचा चोरट्यांचा बेत फसल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला़
परंडा : शहरातील ऐतिहासिक किल्ल्यातील एक प्राचीन तोफ भंगारात विकण्याचा चोरट्यांचा बेत फसल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला़ दरम्यान, ही तोफ असल्याचा निर्वाळा पुरातत्त्व विभागाने दिला असला तरी सुरक्षा रक्षकांसह पोलीस प्रशासन मात्र, ही तोफ नसून उखळ असल्याचे सांगत असल्याने या प्रकारामागील गौडबंगाल आहे तरी काय ? असाच प्रश्न समोर येत आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रूई मार्गावरील एका प्रिंटीग प्रेसच्या पाठीमागील खुल्या जागेत शुक्रवारी सकाळी एक प्राचीन तोफ पडल्याची माहिती परंडा पोलिसांना मिळाली होती़ या माहितीवरून पोनि दिनकर डंबाळे, पोलीस उपनिरीक्षक सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ पंचनाम्यानंतर ती तोफ ताब्यात घेतली़ ही तोफ ताब्यात घेतली असली तरी शनिवारी उशिरापर्यंतही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ दरम्यान, सदरील तोफ परंडा किल्ल्यातीलच असल्याची चर्चा शहरात सुरू आहे़ ती तोफ किल्ल्याच्या बाहेर आलीच कशी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भंगार दुकानदारांनी लोखंडी तोफ घेण्यास नकार दिल्याने चोरट्यांनी तोफ रुई मार्गावर फेकून पळ काढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ तर पोनि दिनकर डंबाळे यांनी ती तोफ नसून जुन्या काळातील उखळ असल्याचा अंदाज वर्तविला आहे़