ठाणे अंमलदारासमोर आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:20 AM2017-10-23T01:20:59+5:302017-10-23T01:20:59+5:30
दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात जाऊन चक्क ठाणे अंमलदाराला शिवीगाळ करून हाताची नस कापून आत्महत्येची धमकी देणा-यास पोलिसांनी अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात जाऊन चक्क ठाणे अंमलदाराला शिवीगाळ करून हाताची नस कापून आत्महत्येची धमकी देणा-यास पोलिसांनी अटक केली. ही घटना २१ आॅक्टोबर रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात घडली.
माधव नागोराव सोनकांबळे (१९, रा. मांडवा, जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, फिरोज खान महेबूब खान पठाण हे २१ आॅक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सिटीचौक पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत होते. यावेळी आरोपी माधव हा दारूच्या नशेत ठाण्यात आला. हॉटेल मालकाने मारल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करायची असल्याने तो नशेतच मोठ्याने बोलत होता. यावेळी पठाण यांनी त्यास हळू बोलण्यास सांगितल्याने त्याने थेट त्यांनाच जोरजोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी पठाण यांनी त्याला कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर तो अधिक चवताळला आणि ठाणे अंमलदाराच्या कक्षाबाहेर जाऊन दारूची बाटली फोडली आणि काचेने स्वत:च्या डाव्या हातावर मारून नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावरील अन्य पोलिसांनी त्यास पकडले आणि रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी माधवविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिष खटावकर तपास करीत आहेत.