पत्नी, मुलास वडापावमध्ये विष टाकून मारण्याचा प्रयत्न: पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By राम शिनगारे | Published: August 20, 2023 08:58 PM2023-08-20T20:58:34+5:302023-08-20T20:58:44+5:30
क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वादातुन पत्नी आणि पोटच्या मुलास वडापावमध्ये विष कालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी १९ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
क्रांतीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला आणि तिच्या पतीमध्ये किरकोळ कारणावरुन गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होता. या वादातूनच तक्रारदार महिलेचा पती शेख इसाक याने आपले नातेवाईक शेख ईब्राहीम, शेख युनूस, शेख याकूब, फुरखान (सर्व रा. क्रांतीचौक परिसर) यांच्या मदतीने आणि संगणमत करून १६ ऑगस्टच्या रात्री वडापावमध्ये विष कालवून पत्नी आणि मुलांना खाण्यासाठी दिले होते.
वडापावमधुन वास येत असल्याचे निदर्शनास आल्यावर तक्रारदार महिलेने आणि तिच्या मुलानी वडापाव न खाता फेकून दिले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन पती शेख इसाकसह नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस, शेख याकूब, फुरखान यांच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार राठोड करीत आहेत.