'आधी दारू पाजली नंतर जिवंत जाळले'; गुप्तधनासाठी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 03:51 PM2022-12-10T15:51:10+5:302022-12-10T15:51:19+5:30
सिल्लोड तालुक्यातील घटनेत गंभीर जखमी व्यक्तीचा पाय कापला
औरंगाबाद : दारू पिण्याच्या बहाण्याने घेऊन गेलेल्या एकास गुप्तधानासाठी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा गावात २७ नोव्हेंबरच्या रात्री घडली. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात ७ डिसेंबर रोजी वडोदबाजार पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
गंभीर जखमी भगवान पुंडलिक खरात (४०, रा. बनकिन्होळा, ता. सिल्लोड) यांचा उजवा पाय मांडीपासून निकामी झाल्यामुळे काढावा लागला. कचरू गोपाळ खरात, विठ्ठल एकनाथ फरकाडे, भाऊसाहेब विठ्ठल फरकाडे (सर्व रा. बनकिन्होळा, ता. सिल्लोड), अशी आरोपींची नावे आहेत. जखमी भगवान यांची आई मंडाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भगवानला अधूनमधून दारू पिण्याची सवय आहे. तो २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गोडतेल घेऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर तो परत आलाच नाही. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गावातील एका व्यक्तीने भगवान हे गावाजवळील नालीमध्ये पडलेले असल्याची माहिती दिली. यानंतर भगवान यांचा मुलगा विशालने गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना गावातीलच खाजगी दवाखान्यात नेले. त्याठिकाणी डॉक्टरांना भगवान यांच्या उजव्या पायावर, पोटावर जळाल्यासारखी जखम दिसल्यामुळे सिल्लोड येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला.
कुटुंबातील सदस्यांनी दुसऱ्या दिवशी रुग्णवाहिकेतून भगवान यांना सिल्लोड येथील दवाखान्यात नेले. तेथून घाटीत हलविले. घाटीतील डॉक्टरांनी तपासून गोळ्या देत परत पुन्हा येण्याच्या सूचना केल्या. घरी गेल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी भगवान यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना तीन आरोपींनी गावाबाहेर उचलून नेले. अज्ञात ठिकाणी नेऊन दारू पाजली. त्यानंतर निर्वस्त्र करीत गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून मारहाण केली. त्याचवेळी शेतात पाणी भरण्यासाठी शेतकरी आल्याच्या आवाजामुळे तिघे पळून गेले. त्यानंतर परत येत त्यांनी त्याला गावकुसाबाहेर आणून नाल्यात टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
प्रकृती खालावल्यामुळे पुन्हा दावाखान्यात
घरी असताना भगवान यांची प्रकृती खालावल्यामुळे ५ डिसेंबर रोजी गावातील सरपंच व पाेलिसांच्या मदतीने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी ६ डिसेंबर रोजी पायाची दुखापत पाहून डॉक्टरांनी उजवा पाय मांडीपासून काढून टाकला आहे. गुन्हा दाखल झालेले तिन्ही आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर करीत आहेत.