घाटीत मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:50 AM2017-10-17T01:50:13+5:302017-10-17T01:50:13+5:30
घाटी रुग्णालयाच्या परिसरातून लहान मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना नागरिकांनी बेदम चोप देत सुरक्षारक्षकांच्या स्वाधीन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या परिसरातून लहान मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना नागरिकांनी बेदम चोप देत सुरक्षारक्षकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़
घाटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोनवर्षीय मुलगा त्याच्या मामासोबत सोमवारी (दि़ १६) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घाटीत आला होता़ घाटीच्या परिसरातील फुटपाथवर मामाने भाच्याला उभे केले होते़ यावेळी काही व्यक्तींनी भाच्यासोबत संवाद साधण्यास सुरुवात केली़ मामाने त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु थोड्याच वेळात आपला भाचा दिसत नसल्याचे मामाच्या लक्षात आले, तसेच भाच्यासोबत बोलणारेही नव्हते. त्यामुळे मामाने आरडाओरड केल्याने नागरिक गोळा झाले. यावेळी एक व्यक्ती पळून जाताना लोकांच्या नजरेस पडली. त्यास लोकांनी पकडून विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़ त्यामुळे जमावाने त्याला चोप दिला. त्याने दिलेल्या माहितीवरून दुस-या साथीदाराला पकडण्यात आले़ पोत्यासह त्यांच्याजवळ आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या़ या दोघांना बेगमपुरा पोलीस ठाण्यात नेले़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़