दोन खाजगी बसवर दगडफेक करुन लुटीचा प्रयत्न; जिकठाण फाट्यावरील थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 01:20 PM2023-07-29T13:20:40+5:302023-07-29T13:21:08+5:30
पोलिसांनी दोघांना पाठलाग करुन ताब्यात घेतले
- मेहमूद शेख
वाळूज महानगर : दोन खाजगी ट्रॅव्हल बसेसवर दगडफेक करुन प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न फसल्याची घटना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास नगररोडवरील जिकठाण फाट्याजवळ घडली. बसेसवर दगडफेक करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले असून त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्रे जप्त करण्यात आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
पुणे येथुन शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संजय ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक एम.एच.३८, एफ.२०९९) चालक संतोष रंगलाल जाधव (रा.धुमका,ता.जि.वाशिम) व वाहक यशवंत दिनकर करवले (४२, रा.इंदौर) हे २९ प्रवास्यांसह हिंगोलीला जाण्यासाठी निघाले होते. पुणे-नगर महामार्गावरुन हिंगोलीच्या दिशेने जात असतांना नगररोडवरील जिकठाण फाट्याजवळ या बसवर अचानक दगडफेक सुरु झाली. बससमोरील काच फुटल्याने चालक संतोष जाधव याने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्याकडेला उभी केली. याचवेळी पाठीमागून खुराणा ट्रॅव्हलची बस ( क्रमांक एम.एच.४०,सी.एम.४५८८) मुंबईडून जवळपास ३७ प्रवासी भरुन नागपूरच्या दिशेने येत होती. या बसवर देखील दगडफेक करण्यात आल्याने चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. दरम्यान, दोन्ही चालकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी दोन आरोपींना पाठलाग करुन पकडले
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल ढोले, उपनिरीक्षक सखाराम ढोले, उपनिरीक्षक भगवान मुजमुले, पोकॉ.विकास जाधव, पोकॉ. श्याम जगताप आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नगररोडवर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध सुरु केले होता. काही अंतरावर पोलिसांना पाहून दोघे पळताना दिसले. त्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. अक्षय भोसले (२१) व आतिश पवार (२२, दोघेही रा.नबाबपुरवाडी, ता.गंगापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून धारदार चाकू, कटर, कात्री, पक्कड व एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.