भाजप-सेनेच्या वादातील दोन महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न; जाणून घ्या पूर्ण प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 01:19 PM2021-09-04T13:19:26+5:302021-09-04T13:20:18+5:30
एकीवर खासगी रुग्णालयात उपचार, तर दुसरी घाटी रुग्णालयात
औरंगाबाद : पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा नवा अंक शुक्रवारी पहायला मिळाला. भाजप जिल्हा सचिव दांपत्याच्या विरोधात तक्रार दिलेल्या महिलेने सकाळीच फिनेल प्राशन केल्याची घटना घडली. यानंतर काही वेळातच भाजप जिल्हा सचिवांच्या पत्नीने विषारी द्रव प्राशन केले. या दोघींवर अनुक्रमे घाटी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पुंडलिकनगर भागात शिवसेना आणि भाजपमधील वाद टोकाला पोहोचला आहे. या वादात दोन महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचार चालू असलेल्या दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर असून, पोलिसांनी दोघींचा जबाब नोंदविला आहे. यात तक्रारदार महिलेने बदनामी झाल्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे जबाबात म्हटले आहे. तर दामले यांच्या पत्नीने शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याच्या प्रकार सहन न झाल्यामुळे विषारी द्रव प्राशन केल्याचे म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणात वरिष्ठाच्या पूर्वपरवानगीने नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली.
बाल भिकाऱ्यांचे पालक शोधणार; बालकल्याण समिती राबविणार 'मुस्कान' अभियान
काय आहे प्रकरण ?
भाजप जिल्हा सचिव अशोक दामले यांनी घरासमोर राहणाऱ्या भाडेकरू महिलेला मारहाण केल्याचा प्रकार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुढे आला होता. या प्रकरणात दामले यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर दामले यांनीही परिसरातील २८ नागरिकांच्या सह्यांचा एक अर्ज पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात देत संबंधित महिलेच्या विरोधात विविध आरोप केले होते. दामले यांनी काही व्हिडिओ, छायाचित्र व्हायरल केल्याचा मुद्दा उपस्थित करीत शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दामले यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. तेव्हा भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. यानंतर भाजप व शिवसेनेत जोरदार राडा झाला. या प्रकरणात दामले यांच्याच विरोधात महिलेच्या तक्रारीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलीस आयुक्तांनी ठाण्याला भेट देत राजकीय राड्यावर नापसंती व्यक्त केली होती. यानंतर हे प्रकरण शांत होण्याची शक्यता होती. मात्र शुक्रवारी तक्रारदार महिलेने फिनेल प्रशान केल्याचे समोर आले. यानंतर काही वेळातच दामले यांच्या पत्नीनेही विषारी द्रव प्राशन केल्याची घटना घडली.
राजकीय कुरघोड्यांनी पोलीस त्रस्त
पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाडेकरू महिलेच्या प्रकरणात राजकीय कुरघोड्या करण्यात येत आहेत. या कुरघोडीचा त्रास पोलिसांना होत आहे. दोन्ही गट सतत कोणाला उचकावून देत पोलीस ठाण्यापर्यंत वाद घेऊन येत आहेत. या दररोजच्या कुरघोड्यांना पोलीस कंटाळले असल्याची प्रतिक्रिया एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कायद्याचा सन्मान केला पाहिजे, अशी अपेक्षाही अधिकाऱ्याने व्यक्त केली.
सगळा घटनाक्रम
१) २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता भाडेकरू महिलेसोबत अशोक दामले यांच्या पत्नीचा वाद. या वादात दामले यांनी मारहाण केल्याची पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेची दुपारी तक्रार.
२) महिलेने तक्रार दिल्याची माहिती समजताच दामले यांच्यासह २८ नागरिकांनी तक्रारदार महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणारा अर्ज २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ठाण्यात दिला.
३) महिलेच्या तक्रारीवरून ३० ऑगस्ट रोजी दामले दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल.
४) ३१ ऑगस्ट रोजी शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दामले यांच्या विरोधात तक्रार महिलेचे व्हिडिओ, छायाचित्र व्हायरल करीत बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. त्याचवेळी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी दामले यांच्या बाजूने धावले. पोलीस ठाण्यासमोरच जोरदार वादावादी. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून दामले यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल.
५) १ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची पुंडलिकनगर पोलीस ठाण्याला भेट.
६) ३ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता तक्रारदार भाडेकरू महिलेने बदनामी झाल्यामुळे फिनेल प्राशन केले. त्यानंतर दामले यांच्या पत्नीने नवऱ्याला शिवसेना महिला आघाडी टार्गेट करीत असल्यामुळे १० वाजता विष प्राशन केले.