महिला कामगारासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:06 AM2021-06-09T04:06:16+5:302021-06-09T04:06:16+5:30
वाळूज महानगर : कंपनीतील कामगार महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपनी मालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ...
वाळूज महानगर : कंपनीतील कामगार महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपनी मालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रांजणगाव परिसरातील २९ वर्षीय महिला वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत असताना तिच्या डाव्या हाताचे बोट तुटले होते. या अपघातानंतर ती महिला उपचार घेऊन घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी कंपनी मालक सय्यद अश्पाक (रा. बीडकीन, ता. पैठण) हा तिच्या घरी गेला. सय्यद अश्पाक याने त्या महिला कामगारास, तू मला तुझा पती किंवा मित्र समज, मला हवे तसे करू दे, तुझा फायदा करून देईन. तुझ्या दवाखान्याचा खर्च करील असे सांगत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास पती-पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या पतीची प्रकृती खराब असल्याने तिने या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र कंपनी मालक सय्यद अश्पाक हा दररोज चार ते पाच दिवस घरी येऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. महिलेच्या पतीची प्रकृती सुधारल्याने व तिने सोमवारी (दि.७) एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून कंपनी मालक सय्यद अश्पाक याच्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक चेतन ओगले हे पुढील तपास करीत आहेत.
------------------------