अर्थव्यवस्था आणि आरोग्य यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:04 AM2021-03-08T04:04:32+5:302021-03-08T04:04:32+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात आणि शहरात अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यामध्ये अर्थकारण आणि आरोग्याची काळजी यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. ...
औरंगाबाद : जिल्ह्यात आणि शहरात अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यामध्ये अर्थकारण आणि आरोग्याची काळजी यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. उद्योगांचे चक्र, जनसामान्यांची दैनंदिनी आणि राजकीय दबावाचा सारासार विचार करून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्णय घेतल्याचे दिसते.
महापालिका आणि आरोग्य यंत्रणा संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या बाजूने असले तरी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी उद्योग संघटना सीआयआय, मसिआ, सीएमआयए, व्यापारी महासंघ यांच्याशी रविवारी दिवसभर चर्चा करून सायंकाळी सर्वंकष निर्णय घेतला. उद्योजकांनी रविवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपाययोजना आणि अर्थकारण याबाबतची वस्तुस्थिती मांडली.
उद्योगचक्र सुरळीत चालावे, हातावर पोट असणाऱ्यांचे नुकसान होऊ नये. या अनुषंगाने सर्व संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. त्यामुळे एका दबाव सर्व प्रशासकीय यंत्रणांवर होता. पगारदार यंत्रणेचे नुकसान होणार नाही, परंतु रोजंदारी मजुरांचे मोठे नुकसान होण्याची भीती अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्यानंतर त्यांनी रविवारी दुपारनंतर मनपा, आरोग्य, पोलीस प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतला.
सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर होणार असल्याच्या अफवेमुळे शहर आणि जिल्ह्यात संदिग्ध वातावरण निर्माण झाले होते. त्यातच खा. इम्तियाज जलील, आ. अतुल सावे आणि मनसेचे उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी १०० टक्के लॉकडाऊनला विरोध केला होता. लॉकडाऊन हा संसर्ग रोखण्यासाठी पर्याय असू शकत नाही. सामान्यांचे हाल होतील, अशी भूमिका घेत या पक्षांनी विरोधाचे हत्यार उपसले होते.
उद्योग वर्तुळातून निणर्यामुळे समाधान
सीआयआयचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रशासकीय यंत्रणांनी घेतलेला हा निर्णय संतुलन साधणारा निर्णय आहे. मुव्हमेंटवर बंधने असावीत आणि अर्थकारणही चालावे हे महत्त्वाचे आहे. उद्योगांचे १०० टक्के उत्पादन निर्यात आणि आयातीवर अवलंबून होते. लॉकडाऊन- सारख्या निर्णयामुळे उद्योगांसह सामान्यांपर्यंत परिणाम झाले असते. लॉकडाऊनचा निर्णय उत्पादकांसाठी आव्हानात्मक राहिला असता.
रविवारी उद्योजकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आले. उद्योजक कोरोना टेस्ट वाढविणार आहेत. शहरातही टेस्ट वाढविल्या पाहिजेत. व्याधिग्रस्तांना लसीकरण देऊ केली आहे, त्या धर्तीवर ४५ वर्षांपुढील उद्योगांतील कामगार यांनाही लस देण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. प्रत्येक कंपनीत शिबीर घेऊन जास्तीत लसीकरण करावे, अशी सूचना कुलकर्णी यांनी केली.