‘रेल रोको’चा प्रयत्न, पोलिसांनी रोखताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:02 AM2021-02-20T04:02:06+5:302021-02-20T04:02:06+5:30
रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : तीन कृषी कायदे आणि कामगारविरोधी कायदे परत घेण्याच्या मागणीसाठी अखिल ...
रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तीन कृषी कायदे आणि कामगारविरोधी कायदे परत घेण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा, जनआंदोलन संघर्ष समितीने गुरुवारी रेल्वे स्थानक येथे रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अडवल्याने प्रवेशद्वारावरच आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी आणि कामगार विरोधातील काळे कायदे परत घ्यावेत, अशी मागणी करत केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
रेल रोको आंदोलन होणार असल्याची माहिती मिळाल्याने या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिसांसह स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आला होता. अखिल भारतीय किसान सभेचे भगवान भोजने, बुद्धीनाथ बराळ, अनिल थोरात, भाऊसाहेब झिरपे, समाधान बारगळ, डॉ. उमाकांत राठोड, चंद्रकांत चव्हाण, नामदेव मोरे, बाबासाहेब वावळकर, लक्ष्मण सुरडकर, अजय भवलकर आदी रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांना रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि वेदांत नगर पोलिसांनी स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच रोखले. हे आंदोलन करण्याची परवानगी नाही, असे सांगत त्यांना स्थानकात प्रवेश करण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे प्रवेशद्वारावरच जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.
फोटो ओळ...
रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर अखिल भारतीय किसान सभा, जनआंदोलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.