मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू: अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:44 PM2022-09-15T12:44:13+5:302022-09-15T12:45:34+5:30
एखाद्या व्यक्तीसाठी स्वातंत्र्य दिनाची वेळ बदलल्या जात नाही.
- अमेय पाठक
औरंगाबाद:मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीसाठी स्वातंत्र्य दिनाची वेळ बदलल्या जात नाही. दिल्लीहून 'बादशहा' हैदराबादला येणार आहेत, तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाण्यासाठी म्हणून हा वेळ बदलला जात आहे. मात्र, हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशा इशारा विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिला.
दानवे पुढे म्हणाले, राज्य सरकारने ७५ व्या मराठवाडा मुक्ती दिनाची दखल घेतलेली नाही. औरंगाबाद येथे होणारा कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच दिवशी गृहमंत्री अमित शहा यांच्या हैदराबादला होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहायचे आहे. यामुळे शहरातील कार्यक्रम सकाळी ७ वाजता घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. पण एखाद्या व्यक्तीसाठी वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू असेही दानवे म्हणाले.
सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही
वेदांता आपल्याकडे येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती. तरी प्रकल्प गुजरातला पळवला जातो. वेदांता प्रकल्पासाठी कर्नाटक आणि तेलंगणाचा समावेश होता. परंतु, गुजरातचा कधीच नव्हता. या प्रकल्पामुळे राज्यातील 1 लाख युवकांना रोजगार मिळाला असता. मात्र, दिल्लीच्या बादशहाचे हस्तक असलेले राज्य सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही, अशी टीका दानवे यांनी केली.