पती-मुलाच्या मृत्यूनंतर घर बळकावण्याचा प्रयत्न; भूमाफियांमुळे वृद्धेने घेतल्या झोपेच्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 12:17 PM2022-10-31T12:17:11+5:302022-10-31T12:19:44+5:30
घरावर नाव लिहिणे, झेंडे लावणे, सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्यासह शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढत होते
औरंगाबाद : पती, मुलाच्या निधनानंतर एकटीच राहणाऱ्या ७६ वर्षांच्या वृद्ध महिलेचे घर बळकाविण्याचा प्रयत्न भूमाफिया करीत आहेत. वृद्धेला धमकावले. २० ऑक्टोबर रोजी घरालाच आग लावली. या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खात आत्महत्येचा प्रयत्न शनिवारी केला. वृद्धेवर घाटी रुग्णालयातील वाॅर्ड नंबर पाचमध्ये उपचार सुरू आहेत.
सुमन रंगनाथराव धोंगडे (ग.नं. २, विश्रांतीनगर, गारखेडा परिसर) असे या महिलेचे नाव आहे. सुमनबाई यांच्या पतीसह मुलाचे निधन झाले आहे. त्या एकट्याच राहतात. त्यांच्या घरावर मागील वर्षभरापासून गुंड प्रवृत्तीच्या सात लोकांचा डोळा आहे. ते घरी येऊन घर खाली करण्यासाठी त्रास देत आहेत. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारही केली. मात्र गुंडांवर कारवाई झाली नसल्यामुळे त्यांचा त्रास अधिकच वाढला. घरावर नाव लिहिणे, झेंडे लावणे, सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्यासह शिवीगाळ करण्यात येत आहे. याविषयी परिसरातील नागरिकांनीही २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सार्वजनिक तक्रार केली होती. त्यानंतरही त्रास कमी झाला नाही. १ ऑक्टोबर रोजी दोन गुंडांनी घरी येऊन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी सकाळी घराला आग लावली. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे अनर्थ टळला. या दररोजच्या छळाला कंटाळून उपचाराच्या झोपेच्या गोळ्या अतिप्रमाणात सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न सुमनबाई यांनी शनिवारी केला. त्यांच्यावर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत हाेते. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे घाटीत हलविण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांकडे मदतीसाठी याचना
वृद्ध सुमनबाई यांचे घर जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना २० ऑक्टोबर रोजीच निवेदन देत गुंडांच्या त्रासापासून मुक्तता मिळवून देण्याची मागणी केली. या निवेदनावर ७ गुंडांची नावे व पत्तेही दिले आहेत. या निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्यामुळे आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यात आल्याचा आरोप वृद्धेच्या मुलीने 'लोकमत'शी बोलताना केला.