विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर प्रशिक्षकाचा जीवन संपविण्याच्या प्रयत्न; तेवढ्यात पोलिस आले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:07 PM2024-10-17T12:07:27+5:302024-10-17T12:10:15+5:30
स्पर्धेसाठी जाण्याचे सांगून राष्ट्रीय खुळाडू १३ वर्षीय विद्यार्थिनीवर प्रशिक्षकाकडून अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : खो-खो राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा विकृत प्रशिक्षक शिवाजी जगन्नाथ गोरडे (रा. बालानगर, ता. पैठण) याला वेदांतनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.
पीडित मुलीची काही दिवसांपूर्वी खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. २६ सप्टेंबर रोजी शिवाजीने त्याच्या तयारीसाठी तिला मुंबईला जायचे असल्याचे कारण सांगून तिला शहरातील मुख्य रेल्वेस्थानक परिसरात आणले. तेथून थेट तिच्यावर धाकदपटशाही करत हॉटेल ग्रेट पंजाबमध्ये नेले. मुलीने प्रतिकार करूनही तिच्यावर खोलीमध्ये पाशवी अत्याचार केले. राष्ट्रीय स्तरावरील खो-खोचा खेळाडू असल्याचा प्रभाव व प्रशिक्षक असल्याने पीडिता मात्र या घटनेमुळे घाबरून तणावाखाली गेली होती. मंगळवारी पीडितेने हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर ते शहरात आले. दामिनी पथकाच्या मदतीने त्यांनी वेदांतनगर ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांच्याकडे तक्रार केली. यात शिवाजीसह त्याला हॉटेलची खोली उपलब्ध करुन देणाऱ्या हॉटेल मालक पूजा रोहित राठोड व सादिक मिर्झा बेग यांनादेखील सहआरोपी करण्यात आले.
आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आणि पोलिस पोहोचले
निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक संगीता गिरी, वैभव मोरे, अंमलदार बाळाराम चौरे, रंजूसिंग सुलाने प्रवीण मुळे, शिवाजी गायकवाड यांचे पथक मंगळवारी रात्रीतून शिवाजीच्या अटकेसाठी गावात धडकले होते. मात्र, तो घरी मिळून आला नाही. आसपास शोध घेत असताना तो शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शेतात धाव घेतली असता शिवाजी गळ्याला साडी बांधून झाडाला लटकून घेण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यापूर्वीच पोलिस पाेहोचल्याने त्याला फासावरून उतरवून ताब्यात घेतले. यात त्याच्या गळ्याला दुखापत झाल्याने पैठणच्या स्थानिक रुग्णालयात उपचार करून रात्री शहरात आणण्यात आले. शिवाजी हा विवाहित असून त्याला तीन अपत्ये आहेत. शिवाय त्याचे दोन भाऊदेखील शिक्षक आहेत. सधन कुटुंबातील शिवाजीच्या या कृत्याने मात्र गावकऱ्यांनीदेखील तीव्र संताप व्यक्त केला.