‘सीईटी’ सेलच्या विभागीय मेळाव्याला एकाच विद्यार्थिनीची हजेरी, प्रवेश नियामक मंडळाचा कारभार

By राम शिनगारे | Published: July 7, 2023 05:57 PM2023-07-07T17:57:47+5:302023-07-07T17:58:43+5:30

एमजीएम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सुसंवाद मेळाव्याची शेकडो बॅनर लावल्याचे दिसून आले. मात्र, त्याविषयी माहिती प्रसारमाध्यमांसह इतर महाविद्यालय, पालकांना दिलेली नव्हती.

Attendance of a single student at the seminar of the 'CET' cell, admission control boards working | ‘सीईटी’ सेलच्या विभागीय मेळाव्याला एकाच विद्यार्थिनीची हजेरी, प्रवेश नियामक मंडळाचा कारभार

‘सीईटी’ सेलच्या विभागीय मेळाव्याला एकाच विद्यार्थिनीची हजेरी, प्रवेश नियामक मंडळाचा कारभार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय, अभियांयात्रिकी, कृषी, औषधनिर्माणसह शेकडो अभ्यासक्रमांना १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियमन करणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमजीएम विद्यापीठातील आर्यभट्ट सभागृहात विद्यार्थी व पालकांसाठी सुसंवाद मेळाव्याचे आयोजन गुरुवारी (दि. ६) केले होते. लाखो विद्यार्थ्यांच्या संबंधित मेळाव्यास फक्त २५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्यातील २४ विद्यार्थी एमजीएम विद्यापीठात शिक्षण घेणारे होते. तर फक्त एकाच विद्यार्थिनी ‘सीईटी’ सेलतर्फे होणाऱ्या प्रवेशाची माहितीसाठी मेळाव्याला हजेरी लावल्याचे चित्र ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले.

‘सीईटी’ सेलतर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशांची माहिती देण्यासाठी विभागीय मेळाव्याला प्रवेश नियामक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सीईटी सेलचे समन्वयक मंगेश निकम, राजेंद्र लोंढे, सिद्धेश नर, डॉ. विजय सपकाळ व्यासपीठावर उपस्थित होते. सभागृहात एकूण सीईटी सेलच्या संबंधित ९ जण होते. तर २५ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. त्यातील १७ विद्यार्थी हे जेएनईसी अभियांत्रिकीच्या पोशाखातील होते. त्याशिवाय इतर ७ विद्यार्थी एमजीएममधील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय एकमेव आलेली विद्यार्थिनी ही पालकासोबत आली होती. तिच्या पालकांस बॅनरवरून विभागीय मेळावा असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. या मेळाव्याची प्रसारमाध्यमांनाही माहिती दिलेली नव्हती. तसेच विभागीय तंत्रशिक्षण विभागही मेळाव्याविषयी अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लाखो रुपयांची उधळपट्टी करून कोणासाठी हा विभागीय मेळावा आयोजित केला होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लाखोंचे बॅनर अन् भावांचे मार्गदर्शन
एमजीएम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सुसंवाद मेळाव्याची शेकडो बॅनर लावल्याचे दिसून आले. मात्र, त्याविषयी माहिती प्रसारमाध्यमांसह इतर महाविद्यालय, पालकांना दिलेली नव्हती. या बॅनरवर लाखोंचा खर्च करण्यात आला. मेळाव्यात नियामक मंडळाचे अध्यक्ष जे. पी. डांगे आणि शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले त्यांचे भाऊ डॉ. एस. पी. डांगे यांनी मार्गदर्शन झाले. त्यातही निव्वळ सोपस्कार उरकल्याचे दिसले. या प्रकाराविषयी अध्यक्ष डांगे यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

Web Title: Attendance of a single student at the seminar of the 'CET' cell, admission control boards working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.