पोस्टातील लेटलतिफांना आता बसणार चाप; थम सिस्टिमद्वारे हजेरी घेणे सुरू
By साहेबराव हिवराळे | Published: June 27, 2024 08:04 PM2024-06-27T20:04:09+5:302024-06-27T20:04:19+5:30
सिस्टिम टाकतेय कात; पोस्ट कर्मचारी झाले अलर्ट
छत्रपती संभाजीनगर : काॅर्पोरेट क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर अधिक जोर दिला जातो, त्याच कृतीचा अवलंब करून एकेकाळी मरगळ आलेल्या पोस्टाने आता कात टाकलेली दिसत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी सर्वच स्टाफ वेळेवर कार्यालयात यावा, लेटलतिफांना चाप बसण्यासाठी थम सिस्टिम हजेरी पोस्टातही सुरू केली आहे.
‘मी कामानिमित्त बाहेर आहे’, किंवा ‘इतर कामा’चे निमित्त सांगून होणारा विलंब आता टळणार आहे. सतत तीन ‘लेट इन’चा थम असल्यास हजेरीच्या जागेवर सुटी टाकावी लागणार किंवा पगार कटणार या भीतीने कर्मचाऱ्यांचीही नियमित हजेरी वेळेवर लावण्याचा प्रयत्न आहे.
मोबाइल ॲपदेखील कर्मचाऱ्यांकडे दिलेले असल्याने ऑनलाइन लोकेशनही आता कर्मचाऱ्यांचे दिसत आहे. ठराविक ठिकाणचे टपाल लेट होत असेल तर त्याला ‘ट्रॅक’ करणे शक्य होणार आहे. आता मोबाइलसंदेशद्वारे हे कळेल. आधार कार्ड वाटप, ड्रायव्हिंग लायसन्स, आयुर्विमा पॉलिसी तसेच सरकारी कागदपत्र सातत्याने आता टपाल कार्यालयामार्फतच येत आहेत.
उपक्रम जोरात..
पोस्टाच्या वतीने सुकन्या समृद्धी तसेच विविध योजना ज्येष्ठांसाठी सुरू केल्या आहेत. त्यांच्या आत्मविश्वासाला पोस्टाने बळ दिलेले आहे. त्यामुळे निवृत्तांच्या ठेवीलादेखील चांगले व्याज दिले जात आहे. आरोग्यासाठी पॉलिसीसह विविध योजनांसाठीही पोस्ट कर्मचारी घरोघरी जाऊन नोंदणी करत आहे. निवृत व ज्येष्ठांच्या पेन्शन पोहोचविण्याचे कामही टपाल कर्मचारी करतात. हे सर्व चालू असताना विनाकारण हजेरी टाळू नका असेही पोस्टल कर्मचारी युनियनचे देवेंद्र परदेशी यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.
कार्पोरेट क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर....
पोस्टाने जनतेच्या मनातील आत्मविश्वास जपलेला असून, तो टिकविण्यासाठी कर्मचारी व अधिकारी सर्वजण अतिदक्षतेने आता काम करतात, शक्यतो आता लेटलतिफ नाहीत.
-असदउल्ला शेख , सहायक निदेशक क्षेत्रीय डाक कार्यालय