प्रवाशांनो, लक्ष द्या, ‘डेमू रेल्वे १५ दिवस रद्द’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 05:24 PM2023-01-10T17:24:04+5:302023-01-10T17:24:30+5:30
अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता
औरंगाबाद : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कोपरगाव ते कान्हेगाव रेल्वेस्टेशनदरम्यान दुहेरीकरणच्या कामासाठी लाइन ब्लाॅक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात दौंड-निझामाबाद डेमू रेल्वे, निझामाबाद-पुणे डेमू रेल्वे १५ दिवस रद्द केल्या आहेत. त्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दौंड-निझामाबाद डेमू रेल्वे १० ते २४ जानेवारीदरम्यान रद्द करण्यात आली आहे. या रेल्वेबरोबरच निझामाबाद-पुणे डेमू रेल्वे १२ जानेवारी ते २६ जानेवारीदरम्यान रद्द करण्यात आली आहे तर २३ जानेवारीला काकीनाडा येथून सुटणारी काकीनाडा– श्री साईनगर शिर्डी एक्स्प्रेस सिकंदराबाद, वाडी, दौंड, पुणतांबामार्गे वळविण्यात आली आहे. २४ जानेवारीला श्री साईनगर शिर्डी येथून सुटणारी श्री साईनगर शिर्डी – काकीनाडा एक्स्प्रेस पुणतांबा, दौंड, वाडी, सिकंदराबादमार्गे वळविण्यात आली आहे.