पर्यटकांनो लक्ष द्या; गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद, वन विभागाचा आदेश
By साहेबराव हिवराळे | Published: July 11, 2024 07:31 PM2024-07-11T19:31:35+5:302024-07-11T19:31:56+5:30
वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती; वनसंपदेचीही निगा
छत्रपती संभाजीनगर : गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. पावसाळ्यात वन परिक्षेत्रात नवनवीन वृक्षांच्या बिया रुजण्याच्या अवस्थेत असतात. या कोवळ्या रोपांवर पर्यटकांची पावले पडल्यास ती रोपे नष्ट होतात. परिणामी, नवीन वृक्षसंपदा वाढीस लागण्यात अडथळा येतो. यासोबतच पावसाळ्याचे तीन महिने हे जवळपास सर्वच पशुपक्षी, कीटकांच्या विणीचा हंगाम असतो. पर्यटकांच्या उपस्थिती आणि हस्तक्षेपामुळे त्यांच्या क्रियेत बाधा उत्पन्न होते. यामुळे त्यांच्या वंशवाढीतही बाधा उत्पन्न होते. पर्यटक मंडळी वनक्षेत्रात मोठमोठ्याने आवाज करतात. यामुळे हे जीव घाबरतात. वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती वाढली असल्याने खबरदारी गरजेची आहे.
व्यवस्थापन आराखड्यातील तरतूद
-वन्यजीव विभागाचे दर दहा वर्षांसाठी व्यवस्थापन आराखडा मंजूर करण्यात येतो.
- २०१४-१५ ते २०२४-२५ या दहा वर्षांसाठीच्या व्यवस्थापन आराखड्यातील बाब क्रमांक ३. ६ नुसार
गौताळा औट्रम
अभयारण्यात तीन महिने प्रवेशास बंदी ठेवण्याची तरतूद आहे. या दोन कारणांखेरीज गौताळा वन परिक्षेत्रात अनेक धोकादायक स्थळे आहेत. नदी, नाले, दरी, मोठी झाडे यामुळे पावसाळ्यात पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. म्हणून मागील वर्षीपासून ही बंदी करण्यात येते.
वनसंपदा संरक्षणाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. मागील वर्षी बंदी असूनही अनेक पर्यटकांनी गौताळ्यात पर्यटन केले होते. पर्यटक केरकचरा, अस्वच्छता, प्लास्टिक वस्तू टाकून पर्यावरणास धोका निर्माण करतात.
- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव संरक्षक
दक्षता घ्या..
पर्यटकांनी स्वत:च्या आणि वन्यजिवांच्या संरक्षणासाठी दक्षता घ्यावी.
- एम. बी. नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग