वाहनधारकांनो लक्ष द्या ! अनपेड चालानचा तात्काळ भरणा करा अन्यथा कोर्टात हजर रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 13:35 IST2021-09-22T13:35:04+5:302021-09-22T13:35:35+5:30
वाहतूक नियम मोडणारे वाहनचालक ई- चालानची तडजोड रक्कम भरण्यास तयार नसतात. अशा वाहनचालकांचे चालान अनपेड या शीर्षाखाली प्रलंबित असते.

वाहनधारकांनो लक्ष द्या ! अनपेड चालानचा तात्काळ भरणा करा अन्यथा कोर्टात हजर रहा
औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून वाहने पळविणाऱ्या १७ हजार २६१ वाहनचालकांना ‘एसएमएस’द्वारे २४ सप्टेंबरपर्यंत ई-चालान रकमेचा भरणा करावा, अन्यथा २५ सप्टेंबर रोजी लोकअदालतीमध्ये हजर राहावे, असे निर्देश वाहतूक पोलीस प्रशासनाने दिले आहेत. एवढेच नव्हे, तर ई-चालान भरण्यासाठी विविध पर्यायही उपलब्ध केले आहेत.
वाहतूक नियम मोडणारे वाहनचालक ई- चालानची तडजोड रक्कम भरण्यास तयार नसतात. अशा वाहनचालकांचे चालान अनपेड या शीर्षाखाली प्रलंबित असते. अशा अनपेड चालान असलेल्या वाहनचालकांनी कारवाईनंतर काही दिवसांत तडजोड रक्कम जमा करणे आवश्यक असते. मात्र, शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेल्या १७ हजार २६१ वाहनचालकांनी ई-चालानची रक्कम जमा केली नसल्याची बाब समोर आली आहे. अशा वाहनचालकांना अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाकडून वारंवार मेसेज पाठविण्यात आले आहेत. यानंतरही त्यांनी चालानची रक्कम जमा न केल्याने शेवटी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शेवटी या वाहनचालकांना एक संधी म्हणून २४ सप्टेंबरपर्यंत चालानची रक्कम जमा करा, अन्यथा २५ सप्टेंबर रोजी लोकअदालतीमध्ये हजर रहा, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
कुठे आणि कसे भरता येईल ई-चालान
शहर, छावणी, सिडको, वाळूज, वाहतूक शाखा निरीक्षक कार्यालयात किंवा विविध चौकात तैनात असलेले वाहतूक हवालदार यांच्याकडे रोखीने ई-चालानची रक्कम जमा करता येईल. यासोबतच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम ॲपद्वारे, ई-चालानवर जाऊन दंडाची रक्कम भरता येईल. महाट्रॅफिक ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून भरणा करावा किंंवा संकेतस्थळावरही दंड भरता येतो.