भद्रा मारूती मुर्तीस आणि घृष्णेश्वर मंदीरात आकर्षक तिरंगी सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 05:32 PM2022-01-27T17:32:48+5:302022-01-27T17:34:05+5:30
धार्मिकस्थळी देशभक्तीचे एक वेगळे रूप भाविकांना बघावयास मिळाले.
- सुनील घोडके
खुलताबाद( औरंगाबाद ) : देशभरात बुधवारी ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात. यावेळी खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या मुर्तीस तिरंगा झेंड्याचे आकर्षक रूप देवून आकर्षक शृंगार करण्यात आला आहे. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मुर्ती भोवती प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सजावट करण्यात आली. धार्मिकस्थळी देशभक्तीचे एक वेगळे रूप भाविकांना बघावयास मिळाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त वाहनावर तिंरगा झेंडा, हॉटेल, दुकानाची तिरंगा रंग संगतीत आकर्षक सजावट आढळून येते. यंदा प्रथमच प्रजासत्ताक दिनानिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या मुर्तीस तिरंगा रंगात आकर्षक शृंगार करण्यात आला. नागवेलीचे पाने, मध्यभागी अशोक चक्र असलेला पांढरा कपडा, तसेच मुर्तीस शेंदूर लावलेले असल्याने तो भगवा रंग असा तिरंगा झेंड्याचे रूप देण्यात आले. खुलताबाद येथील ज्ञानेश्वर नागे, सुनील निकम या हनुमान भक्तांनी ही आकर्षक सजावट केली. या सजावटीचे फोटो लागलीच सोशल मिडियावर व्हायरल झाले.
घृष्णेश्वर मंदीरात ही सजावट
वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीरात ही प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री घृष्णेश्वर महादेव पिंडीजवळ रांगोळी व फुलांनी तिरंगा काढण्यात आला होता. भाविकांना धार्मिक व देशभक्तीचे दोन्ही रूप या ठिकाणी बघावयास मिळाले.
खुलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ परिसरात गर्दी
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांनाच सुट्टी असल्याने औरंगाबाद शहर व परिसरातील मोठ्या प्रमाणावर पर्यटक व भाविकांनी सहकुंटूब खुलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ येथील धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट दिली. गर्दीने हा परिसर फुलून गेला होता.