४ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अभियंत्याच्या पत्नीला भाजपाची उमेदवारी: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 07:05 PM2024-11-09T19:05:47+5:302024-11-09T19:06:26+5:30
चार हजार कोटीचा भष्टाचाराचे पुरावे आम्ही सरकारला दिले. पण त्यांनी काही कारवाई केली नाही. उलट त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली: नाना पटोले
फुलंब्री : पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या विभागात चार हजार कोटीचा भष्टाचार केला. त्याचे पुरावे आम्ही सरकारला दिले. पण त्यांनी काही कारवाई केली नाही. उलट त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. भाजपा भ्रष्टाचाऱ्यांसोबत आहे, त्याचे हे ज्वलंत उदाहरण, असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते शनिवारी वडोदबाजार येथे महाविकास आघाडीचे उमेदार विलास औताडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते
फुलंब्री विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,खासदार डॉ कल्याण काळे, खासदार चंद्रकांत हंडोरे हे जालना येथील सभा आटोपून वडोदबाजार येथे तीन वाजता पोहचले. विलास औताडे यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांनी तडाखेबंद भाषण केले. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही पांढऱ्या दगडावरील काळी रेघ आहे. सरकार आल्यावर देवगिरी साखर करण्यावर असलेले सर्व कर्ज सरकार भरणार व कारखाना सुरु केले जाईल, असे आश्वासन पटोले यांनी दिले. तसेचमराठवाड्यात वॉटरग्रीडचा प्रश्न मंत्री मंडळाच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत घेऊन काम पूर्ण करू, असेही पटोले म्हणाले.
दरम्यान, या सभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष आनंदा ढोके ,धनगर समाजाचे नेते रवी खिल्लारे यांनी नाना पटोले यांच्या उपस्थिती मध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जेष्ठ नेते केशवराव औताडे,उमेदवार विलास औताडे,माजी मंत्री अनिल पटेल,आमदार वजाहत मिर्जा ,शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसुफ ,कमाल फारुकी ,जगन्नाथ काळे,छाया जंगले,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर,शिवसेना तालुकाध्यक्ष सोमनाथ करपे ,वरून पाथ्रीकर ,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे ,धनश्री कांबळे ,कैसर आझाद ,बॉरिष्टर उमर फारुकी ,मुद्दसर पटेल आदि सह अनेकांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदी बोलत नाहीत
देशाचे पंतप्रधान बटेंगे तो कटेंगे बोलतात पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत, इतका दुर्बल पंतप्रधान देशान एकही पहिला नाही. तुकडे करा आणि राज्य करा हेच धोरण त्यांनी मागील दहा वर्षांपासून अवलंबविले आहे, त्याच्यावर विश्वास न ठेवता विकासासाठी विलास औताडे यांना निवडून द्यावे असे आवाहन पटोले यांनी केले.