अतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:42 PM2019-06-15T22:42:37+5:302019-06-15T22:43:27+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अतुल सावे यांचा राज्य मंत्रिमंडळात शनिवारी समावेशाचा निर्णय झाला. सावे यांना ...
औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अतुल सावे यांचा राज्य मंत्रिमंडळात शनिवारी समावेशाचा निर्णय झाला. सावे यांना राज्यमंत्रीपद मिळाल्याची वार्ता शहरात पसरताच भाजपकडून जल्लोष करण्यात आला. सोशल मीडियावर अभिनंदनाच्या अनेक पोस्ट पडू लागल्या.
२०१५ मध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेत आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना विधानसभेचे सभापतीपद देण्यात आले. पूर्व विधानसभा मतदारसंघातील आ. अतुल सावे, गंगापूरचे आ. प्रशांत बंब यांच्यापैकी एकाला तरी मंत्रिमंडळात संधी मिळेल, असा अंदाज होता. मात्र दोघांनाही भाजपने स्थान दिले नाही. आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना ओबीसी चेहरा असलेले अतुल सावे यांना शुक्रवारी अचानक मुंबईला बोलावण्यात आले. सावे यांची मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाने शनिवारी घेतला. दुपारपासूनच शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणित झाला होता. ठिकठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला. सावे यांचे अभिनंदन करण्यासाठी अनेक नेते, कार्यकर्ते सायंकाळीच मुंबईला रवाना झाले.
शुभेच्छांचा वर्षाव
आ. अतुल सावे राज्यमंत्री झाल्याचे कळताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. त्यांच्या पुंडलिकनगर, सिडको एन-६ येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली. या ठिकाणी पेढे वाटप सुरू होते.
भाजपचे सोशल इंजिनिअरिंग
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने औरंगाबादला झुकते माप दिले आहे. मागील महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यात बहुजन वंचित आघाडीने अनेक विधानसभा मतदारसंघांत आपला दबदबा निर्माण केला आहे. अतुल सावे ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन सेना-भाजप युतीने ओबीसी मतदारांना आकर्षित केले आहे.
चांगल्या कामाची पावती
मागील साडेचार वर्षांमध्ये नागरिकांची अनेक कामे केली. पक्षसंघटनेतही जोरदार काम करण्यात आले. आपण केलेल्या कामाची पावती म्हणून पक्षनेतृत्वाने राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले. पूर्व विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासावर अधिक भर देण्यात येणार आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त चांगले काम करण्यात येईल.
अतुल सावे, आमदार