अतुल सावे राजकीय वारसा चालविणार

By Admin | Published: October 22, 2014 12:39 AM2014-10-22T00:39:10+5:302014-10-22T01:21:09+5:30

नजीर शेख, औरंगाबाद यशस्वी उद्योजक, कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास शहराच्या पूर्व मतदारसंघातून नव्याने निवडून आलेले आमदार अतुल सावे यांचा राहिला आहे.

Atul Sawe will run political heritage | अतुल सावे राजकीय वारसा चालविणार

अतुल सावे राजकीय वारसा चालविणार

googlenewsNext

नजीर शेख, औरंगाबाद
यशस्वी उद्योजक, कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास शहराच्या पूर्व मतदारसंघातून नव्याने निवडून आलेले आमदार अतुल सावे यांचा राहिला आहे. राजकीय वारसा असलेल्या सावे कुटुंबातील राजकीय विजनवास अतुल सावे यांनी आमदाराच्या रूपाने संपविला आहे. आमदारकीबरोबरच शहराचे भाजपाचे नेतृत्वही त्यांच्याक डे आले आहे.
वडील मोरेश्वर सावे यांचे शिवसेनेचे राजकीय छत्र हरवल्यानंतर तीन भावंडांपैकी अतुल सावे यांनी राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि पंधरा वर्षांनंतर आमदाराच्या रूपाने ते यशस्वी झाले, असे म्हणता येईल. शिवसेनेचे खासदार असलेल्या मोरेश्वर सावे यांना राजकीय उत्तरकाळ अतिशय कठीण गेला. पक्षाने त्यांची खूपच मानहानी केली होती. १९९५- ९६ च्या सुमारास खा. चंद्रकांत खैरे यांच्याशी मोरेश्वर सावे यांचे खूपच मतभेद झाले होते. शिवसेनेची साथ तुटल्यानंतर मोरेश्वर सावे शांतच राहिले. मात्र, त्यांचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी अतुल सावे पुढे आले. त्यांनी शिवसेनेचा त्या काळातील घनिष्ठ मित्र असलेल्या भाजपाची निवड केली. पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पहिली काही वर्षे त्यांचे ‘प्रोफाईल’ लो राहिले. या काळात त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढविली. मात्र, त्यामध्ये ते पराभूत झाले. त्यानंतर पक्षाच्या राज्य कार्यकारिणीवर त्यांनी काम करायला सुरुवात केली. सध्या ते पक्षाचे राज्य चिटणीस म्हणून काम पाहत आहेत.
नगरसेवक बनण्यात अपयश आल्यानंतर मात्र दशकभर ते शांतच राहिले. २००९ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शहरात पूर्व, पश्चिम (राखीव) आणि मध्य असे तीन मतदारसंघ तयार झाले. यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला मध्य आणि पश्चिम, तर भाजपाच्या वाट्याला पूर्व मतदारसंघ आला. २००९ मध्येही पूर्व मतदारसंघातून त्यांनी पक्षाचे तिकीट मागितले होते. मात्र, त्यावेळी ते त्यांना मिळू शकले नाही. २०१४ मध्ये त्यांना तिकीट मिळाले आणि ते विजयी झाले. सलग दहा वर्षे पक्षाचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले. आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा विचार व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही स्वतंत्र लढणार आहे. यामुळे काँग्रेस किंवा एमआयएम यासारखे पक्षही मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे दिसत आहे.

Web Title: Atul Sawe will run political heritage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.