अबब ! चोरट्यांनी विकले ५00 ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:22 AM2018-05-05T00:22:50+5:302018-05-05T00:24:32+5:30

राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून चोरीचे ट्रक, हायवा आदी महागड्या गाड्या औरंगाबादेत आणून त्यांची संपूर्ण रंगरंगोटी करायची. या वाहनांवर बनावट चेसीस क्रमांक टाकून बीड आरटीओ कार्यालयातून पासिंग करून विकणारे राज्यस्तरीय रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे.

Aub! 500 trucks sold by thieves | अबब ! चोरट्यांनी विकले ५00 ट्रक

अबब ! चोरट्यांनी विकले ५00 ट्रक

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हेगारांची संघटित टोळी : औरंगाबादच्या एका नगरसेवकाचा समावेश; रॅकेटमध्ये बीड आरटीओ कार्यालयीन कर्मचारी

मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून चोरीचे ट्रक, हायवा आदी महागड्या गाड्या औरंगाबादेत आणून त्यांची संपूर्ण रंगरंगोटी करायची. या वाहनांवर बनावट चेसीस क्रमांक टाकून बीड आरटीओ कार्यालयातून पासिंग करून विकणारे राज्यस्तरीय रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे. कोट्यवधी रुपयांची वाहने विकणारा औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवक असून, त्याचे भाऊही यात सहभागी आहेत. भिवंडी गुन्हे शाखेने आतापर्यंत चोरीची ७० पेक्षा अधिक वाहने जप्त केली असून, औरंगाबाद पोलिसांच्या हाती फक्त दोन वाहने लागली आहेत. पाचशेहून अधिक ट्रक विकणाऱ्या टोळीत अनेक आरोपी असून, मुख्य सूत्रधार फरार आहे.
औरंगाबाद शहरातील चिकलठाणा येथे टाटा बॉडी बिल्डर हे गॅरेज मागील अनेक वर्षांपासून आहे. या गॅरेजमध्ये चारचाकी वाहनांची डेंटिंग आणि पेंटिंग करण्यात येते. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील चोरीचे ट्रक, हायवा आदी वाहने येथे आणली जात असत. चोरीच्या वाहनाची अशी रंगरंगोटी होत होती की, मूळ मालकही या वाहनाला ओळखू शकत नाही. येथील अत्यंक कुशल कामगारांकडून वाहनावरील चेसीस क्रमांक गॅस कटरने काढून घेण्यात येत होता. बनावट क्रमांक त्यावर टाकण्यात येत होता. बीड येथील कोणत्याही रिक्षाचा, दुचाकीचा क्रमांक त्यावर टाकण्यात येत होता. एका दिवसात चोरीच्या वाहनाची बनावट कागदपत्रेही तयार करण्यात येत होती. एका दिवसात बीड आरटीओ कार्यालयातून हे वाहन पासिंग करून घेण्यात येत होते. कागदपत्रे हाती येताच वाहन अवाच्या सव्वा दराने विकण्यात येत होते. ज्या ग्राहकाला वाहन विकले त्याच्याकडून पैसे घेताना या रॅकेटचा मुख्य सूत्रधार निकटवर्ती व्यक्तीचा बँक अकाऊंट नंबर देत होता. त्यावर पैसे येताच तो संबंधितांकडून घेत होता. आतापर्यंत या टोळीने पाचशेपेक्षा अधिक वाहनांची विक्री यातून केल्याचे समोर येत आहे.
भिवंडी पोलिसांना यश
भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आले. आतापर्यंत या पोलिसांनी ७० पेक्षा अधिक चोरीचे विकलेले ट्रक, हायवा जप्त केले आहेत. एक महिन्यापासून पोलीस या रॅकेटच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. औरंगाबादेतील जिन्सी पोलीस भिवंडी पोलिसांना अजिबात सहकार्य करीत नसल्याचे समोर आले आहे. तपास अधिकारी संदीप निगाळे औरंगाबादेत वारंवार आले. ते येण्यापूर्वीच आरोपी फरार होतात याचेच पोलिसांना आश्चर्य वाटत आहे. आमच्या तपासात अद्याप या प्रकरणाचा सूत्रधार नगरसेवक आहे, हे समोर आलेले नाही. औरंगाबाद पोलिसांनी काही आरोपी ताब्यात घेतले असतील तर आम्हाला दिले पाहिजे, असे भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. व्ही. राऊत यांनी सांगितले.
...आता औरंगाबाद पोलिसांचा तपास
चोरीचे ट्रक विकण्याचा कुटीर उद्योग औरंगाबादेत मागील अनेक वर्षांपासून सुरू असतानाही पोलिसांना काहीच कल्पना नव्हती. भिवंडी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर औरंगाबाद गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला. आतापर्यंत दोन वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नगरसेवकाच्या भावाला चौकशीसाठी दोन दिवसांपासून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात कोण राजकीय व्यक्ती आहे, हे आम्हाला माहीत नाही. आमचा तपास सुरू आहे. लवकरच गुन्हा दाखल करून अधिक माहिती देण्यात येईल, असे उपायुक्त दीपाली घाडगे यांनी सांगितले.

Web Title: Aub! 500 trucks sold by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.