अबरा का डबरा, गिली गिली छू...!
By Admin | Published: April 22, 2016 12:45 AM2016-04-22T00:45:12+5:302016-04-22T00:55:42+5:30
औरंगाबाद : ‘जितेंद्र रघुवीर मॅजिक शो’ या कार्यक्रमात जगविख्यात जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी चित्तथरारक जादूचे प्रयोग दाखवून उपस्थित बच्चे कंपनीला थक्क केले.
औरंगाबाद : लोकमत कॅम्पस क्लब आयोजित आणि पॉवर्ड बाय इरा इंटरनॅशनल स्कूल ‘जितेंद्र रघुवीर मॅजिक शो’ या कार्यक्रमात जगविख्यात जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी चित्तथरारक जादूचे प्रयोग दाखवून उपस्थित बच्चे कंपनीला थक्क केले.
डिस्कव्हरी स्कूल हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर्स होते. हातचलाखी, हिप्नोटिझम आदी तंत्राचा वापर करून रघुवीर यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. कार्यक्रमाला लोकमतचे सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, इरा इंटरनॅशनल स्कूलचे संचालक सतीश गोरे आणि डिस्कव्हरी स्कूलच्या प्राचार्या स्मिता कंचर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आतापर्यंत २२ देशांमध्ये आपल्या जादूचा आविष्कार दाखविणाऱ्या रघुवीर यांनी सुरुवातीलाच रुमालापासून काठी तयार करून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. हलके-फुलके प्रयोग दाखवून वातावरण निर्मिती केली. त्यानंतर मात्र त्यांनी सादर केलेल्या प्रत्येक जादूने प्रेक्षक अचंबित होत होते.
रिकाम्या लाकडी खोक्यातून एकानंतर एक निघालेल्या विविधरंगी बाटल्यांमुळे बच्चे कंपनी हैराण झाली. ‘गंगेची प्रार्थना’ नामक प्रयोगातून त्यांनी ठराविक अंतराने रिकाम्या कळशीतून बादलीभर पाणी काढून दाखविले. ‘शून्यातून विश्वाची निर्मिती’ या प्रयोगामध्ये एका पोकळ पाईपचा वापर त्यांनी केला. या पाईपमधून छत्र्या, फुले, घड्याळ, तलवार, दिवे आणि शेवटी चक्क ५ साड्या काढून उपस्थितांना धक्का दिला. असे एकापेक्षा एक सरस प्रयोग करून रघुवीर यांनी बालगोपाळांचे मनोरंजन केले.
जितेंद्र रघुवीर यांनी सादर केलेल्या काही चित्तथरारक प्रयोगांमुळे प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सर्वांनी भयानक शांततेत श्वास रोखून या प्रयोगांकडे लक्ष केंद्रित केले
होते. ‘गिलोटीन’ या प्रयोगात रघुवीर यांनी प्रेक्षकांमधून एक जणाला बोलावले. त्यांची मान आणि सोबत दोन काकड्या एका मान कापण्याच्या मशीनमध्ये घालून त्यावर सुरा चालवला. आश्चर्य म्हणजे सुऱ्याचा वार होताच काकड्याचे तुकडे झाले; पण मान मात्र शाबूत राहिली. या प्रयोगानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
‘दी आर्म इल्युजन’ या प्रयोगात रघुवीर यांनी त्यांचा हात एका पुठ्ठ्यात घातला. त्यानंतर हातावर दोन ठिकाणी करवतीने वार केले आणि काही काळापुरता हाताचा मधला भाग गायब केला.
‘हुदिनी बॉक्स’ या प्रयोगात एका व्यक्तीला हातकड्या बांधून पोत्यात गुंडाळून एका लाकडी खोक्यात ठेवण्यात आले. त्या खोक्याला कुलूप लावून चावी प्रेक्षकांना दिसेल अशी ठेवण्यात आली आणि नंतर मात्र, पोत्यातील व्यक्ती बाहेर आणि खुद्द जादूगार जितेंद्र रघुवीर त्या पोत्यात अडकलेले प्रेक्षकांना पाहायला मिळाले. हा प्रयोग सगळ्यात कमी वेळात पूर्ण करण्याचा विश्वविक्रम रघुवीर यांच्या नावे नोंदविला गेला आहे.
‘डबल एक्स्चेंज मिस्ट्री’ मध्ये रघुवीर यांनी बेडशीटमध्ये एका माणसाला लपवले व दुसऱ्यालाच बाहेर काढले.