तलाठ्यांच्या बदल्यांत ‘लिलाव’; नाराजांमध्ये खदखद सुरू,अर्थपूर्ण वाटाघाटींमुळे चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:56 PM2024-08-22T12:56:05+5:302024-08-22T12:57:02+5:30

अनेकांनी चौकशीची मागणी सुरू केली असून, नाराज मंडळी वरिष्ठांना भेटून त्यांच्याकडे दाद मागणार असल्याची चर्चा आहे.

'Auction' in transfer of talathis; The disgruntled people are in a frenzy, demanding an inquiry due to meaningful negotiations | तलाठ्यांच्या बदल्यांत ‘लिलाव’; नाराजांमध्ये खदखद सुरू,अर्थपूर्ण वाटाघाटींमुळे चौकशीची मागणी

तलाठ्यांच्या बदल्यांत ‘लिलाव’; नाराजांमध्ये खदखद सुरू,अर्थपूर्ण वाटाघाटींमुळे चौकशीची मागणी

छत्रपती संभाजीनगर : तलाठ्यांसह प्रशासनातील अनेक पदांच्या बदल्यांचा पोळा बुधवारी (दि. २१) सायंकाळी फुटला. या बदल्यांमध्ये अर्थपूर्ण व्यवहारांच्या चर्चेचे पेव फुटले असून, नाराजांमध्ये खदखद सुरू आहे. अनेकांनी चौकशीची मागणी सुरू केली असून, नाराज मंडळी वरिष्ठांना भेटून त्यांच्याकडे दाद मागणार असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली तलाठ्यांची आस्थापना देण्याच्या शासन निर्णयाला हरताळ फासला गेला आहे. बदल्यांसाठी ‘लिलाव’ झाल्याची चर्चेने जिल्हा प्रशासन वर्तुळ ढवळून निघाले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ११५ तलाठ्यांच्या बदल्यांची यादी तयार करून १४ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या यादीला मंगळवारी ११ वा. मंजुरी दिली. यादी अंतिम होईपर्यंत अनेकांनी विभागीय प्रशासन, जिल्हा प्रशासनकडून दबाव आणून बदली थांबविल्याची चर्चा आहे. बुधवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश निघाले. अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या तलाठ्यांना बदली नको होती, ते विविध माध्यमांतून प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचले. प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी एक तलाठी नेमला होता, मर्जीचा सजा मिळावा, यासाठी त्याच्याकडे नाव देण्याची व्यवस्था केल्याचा सूर नाराजांनी आळविला. मॅटमध्ये प्रकरण जाऊ नये, यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र आदेश देण्यात येणार आहेत. बदल्यांप्रकरणी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शासनाच्या आदेशाची पायमल्ली झाल्याची ओरड सुरू झाली असून, महसूल खात्याने प्रस्थापितांच्या बदलीसाठी घेतलेल्या निर्णयाला हरताळ फासला गेला आहे.

गेल्यावर्षी केलेल्या बदल्या जैसे थे
गेल्यावर्षी उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या बदल्यांमध्ये काहीही निर्णय झालेला नाही. जे पाच ते दहा वर्षांपासून जेथे होते, त्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निकष लावून तेथेच ठेवले. यात संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे भले झाल्याची चर्चा आहे.

नियतकालिक बदल्या
तलाठी - ९८
महसूल सहायक - ४८
अव्वल कारकून - २२
विनंती बदल्या
तलाठी - १२
महसूल सहायक - ३
अव्वल कारकून - ४
मंडळ अधिकारी - ७
वाहन चालक - १
शिपाई - २

बेकायदेशीररीत्या बदली नको
संघटनेने कायदेशीररीत्या बदली करण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या, परंतु निवासी उपजिल्हाधिकारी आणि आस्थापना विभागाने जी प्रक्रिया राबविली ते समोर आले आहे. आमच्याकडे बदलीसाठी काही देवाण-घेवाण झाल्याची एकही तक्रार आलेली नाही. काही गैरप्रकार झाला असेल, तर सगळे काही समोर येईल.
- अनिल सूर्यवंशी, अध्यक्ष राज्य तलाठी महासंघ

-----------------------------------------
विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सवाल
प्रश्न : तलाठी बदल्यांसाठी लिलाव झाल्याची चर्चा आहे.
खिरोळकर : समुपदेशनाने लिखित विकल्प घेऊन बदल्या केल्या आहेत.

प्रश्न : बदल्यांतील वशिलेबाजीमुळे अनेक जण नाराज आहेत?
खिरोळकर : त्याबाबत अद्याप काही कानावर आलेले नाही.

प्रश्न : संघटनेच्या काेणत्या मागण्या मान्य केल्या?
खिरोळकर : एक वर्ष झाले असेल, तर बदली करू नका, ही संघटनेची मागणी मान्य केली.

प्रश्न : शहरात अनेक वर्षांपासून असणाऱ्यांच्या बदल्या केल्या की नाही?
खिरोळकर : काही जणांची बदली केली. काहींना एकच वर्ष झाल्यामुळे ती थांबविली.

Web Title: 'Auction' in transfer of talathis; The disgruntled people are in a frenzy, demanding an inquiry due to meaningful negotiations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.