शहराच्या पाणीपुरवठ्याचे लवकरच ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:05 AM2021-05-06T04:05:27+5:302021-05-06T04:05:27+5:30
औरंगाबाद : शहरात विविध वसाहतीमध्ये पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. तीन दशके महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षांनी पाणी प्रश्नावर ओरड ...
औरंगाबाद : शहरात विविध वसाहतीमध्ये पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. तीन दशके महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षांनी पाणी प्रश्नावर ओरड सुरू केली. त्यामुळे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पाणीपुरवठ्याचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
शहरासाठी राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी किमान ३ वर्ष लागणार आहेत. दरम्यानच्या काळात सध्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शहरात आणल्या जाणाऱ्या पाण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने पांडेय यांनी महापालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. सध्या पाण्याची मागणी वाढली आहे, परंतु वाढत्या मागणीनुसार पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यातच विविध राजकीय पक्ष महापालिका प्रशासनाकडे अतिरिक्त पाण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे जायकवाडीहून औरंगाबाद शहरात नेमके पाणी किती येते, शहरात कोणत्या भागात पाणी कमी पडते, पाण्याची गळती होते का, पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने काय करता येईल या संदर्भात ऑडिट करण्याचे आदेश पांडेय यांनी दिल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.
या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंह देखील उपस्थित होते. पाण्याच्या ऑडिटचे काम प्राधिकरणाने करावे असे पांडेय यांनी सांगितले. त्याला अजयसिंह यांनी सहमती दर्शवली. पाणी पुरवठ्याच्या सध्याच्या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या कशा दूर केल्या जाऊ शकतील याबद्दल देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सूचना करावी असे पांडेय यांनी बैठकीच्या दरम्यान स्पष्ट केल्याचे पानझडे म्हणाले.
फ्लो मीटर तपासणे अत्यंत गरजेचे
अधीक्षक अभियंता अजयसिंह म्हणाले, पाणी पुरवठा योजनेवरील फ्लो मीटर बंद असल्याची माहिती मिळाली आहे. फ्लो मीटर सुरु आहेत का ते प्रथम तपासावे लागेल. हे मीटर बंद असतील तर ऑडिट करताना अडथळे येऊ शकतील, वॉटर ऑडिटसाठी फ्लो मीटर कार्यान्वित असणे गरजेचे आहे.