नाट्यगृहाबाबत वाळूज महानगर उपेक्षितच; उदयोन्मुख कलावंतांसह रसिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 07:31 PM2018-10-24T19:31:46+5:302018-10-24T19:33:54+5:30
शहराला लागूनच असलेल्या वाळूज महानगरात आजपर्यंत एकही नाट्यगृह अस्तित्वात आले नाही.
औरंगाबाद : शहराला लागूनच असलेल्या वाळूज महानगरात आजपर्यंत एकही नाट्यगृह अस्तित्वात आले नाही. कला, साहित्य, संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या सांस्कृतिक विभागालाही याची भुरळ पडली आहे. या परिसरात सुसज्य नाट्यगृह उभारण्यात यावे, अशी मागणी नवोदित कलाकारांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उदयोन्मुख कलावंतांसह नाट्यरसिकांमध्ये आता जोर धरत आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाळूज महानगरातील लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महानगराला लागून नवनवीन नागरी वसाहती निर्माण होत आहेत. याठिकाणी बहुतांश मध्यम वर्गीय कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. येथे मोठमोठी सुसज्ज रुग्णालये, हॉटेल्स, बँका, शाळा-महाविद्यालये आहेत. येथे कलावंतांचीही कमी नाही. रोज कारखान्यात यंत्रासोबत राबणाऱ्या कामगारांनी कलेच्या हिमतीवर नालौकिक केले आहे; परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वाळूज महानगरात कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एकही नाट्यगृह नाही. कोणतेही सांस्कृतिक, कला, साहित्य, स्नेहसंमेलन अथवा राजकीय कार्यक्रम हे मोकळ्या मैदानावर किंवा खाजगी मंगल कार्यालय, कामगार कल्याण केंद्रांमध्येच घ्यावे लागतात.
बारा-बारा तास यंत्रासोबत राबणारा कामगार वर्ग कला, साहित्य, संस्कृती विश्वात काही करू पाहत असेल, त्याच्या जाणिवा साहित्यातून, नाटकातून मांडू पाहत असेल, तर त्यांच्यासाठी या भागात हक्काचे व्यासपीठच हवे. या परिसरात अनेक उदयोन्मुख कलावंत आहेत. कलागुणांचा आविष्कार करण्यासाठी तसेच रसिकांना नाट्य-कलेचा आनंद घेण्यासाठी येथे नाट्यगृह असणे गरजेचे आहे.
कामगार कल्याण मंडळातर्फे दरवर्षी नाट्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. या भागात राहणारे अनेक कामगार-कलावंत यामध्ये सहभागी होत असतात. मात्र, सरावासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ नाही. त्यांना मोकळ्या मैदानात, एखाद्या मंदिरात किंवा घराच्या छतावर नाटकाचा सराव करावा लागतो. अंगी गुणवत्ता आहे; पण सुविधा नसल्याने कलावंतांचा हिरमोड होत आहे. हक्काचे नाट्यगृह असावे, अशी अपेक्षा नाट्य दिग्दर्शक तथा कलावंत अशोक गावंडे यांनी व्यक्त केली.
नेहरू भवनची बकाल अवस्था
पूर्वी शहरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या नेहरू भवनची इमारत पाडण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. नगरपालिकेच्या काळात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ४ हजार ५० चौरस मीटर एवढ्या जागेत नेहरू भवन उभारले. येथे नाटक, मुशायरा, गझल अशा अनेक मैफली रंगायच्या. मात्र, हळूहळू नेहरू भवनची अवस्था अत्यंत दयनीय होत गेली. खुली जागा लग्न, खासगी समारंभासाठी वापरण्यात येत आहे. त्यातून महापालिकेला अपेक्षित उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे ही इमारत पाडून प्रेक्षकगृह, समारंभ हॉल व व्यापारी संकुल तयार करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. नवीन नाट्यगृहे उभारण्याऐवजी आहेत ती पाडून व्यापारी संकुले उभारण्याकडे महापालिकेचा कल आहे. हीच मानसिकता दृढ होत गेल्यास शहरातील सांस्कृतिक सृजनता नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.