महापालिकेच्या ७ शाळा, ५ भूखंड खाजगी संस्थांना देण्याचा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 03:21 PM2020-12-30T15:21:57+5:302020-12-30T15:24:01+5:30

Aurangaabad Municipal Corporation : दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बंद पडलेल्या शाळा खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेकरारावर देण्याचे ठराव मंजूर करण्यात आले.

Aurangaabad Municipal Corporation approves resolution to give 7 schools, 5 plots to private institutions | महापालिकेच्या ७ शाळा, ५ भूखंड खाजगी संस्थांना देण्याचा ठराव मंजूर

महापालिकेच्या ७ शाळा, ५ भूखंड खाजगी संस्थांना देण्याचा ठराव मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाकडून विखंडित करण्याचा फक्त प्रयत्न

औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीच्या ७ शाळा, ५ भूखंड खासगी संस्थेला देण्यासाठी यापूर्वी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आले. हे ठराव विखंडित करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला; परंतु आता प्रशासनानेच शाळेच्या इमारतींवर आर्थिक खर्च करता येत नसल्याचे कारण पुढे करीत बंद पडलेल्या शाळा आणि भूखंड खासगी शैक्षणिक संस्थांच्या घशात घालण्याचा डाव आखला आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर या शाळा शालेय उद्देशांकरिता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनपाकडून ५५ प्राथमिक शाळा आणि १७ माध्यमिक, अशा ७२ शाळा चालविल्या जात असून, त्यातील २२ शाळा भाडेतत्त्वावरील इमारतींमध्ये भरविल्या जात आहेत. या शाळांत १७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; परंतु कालांतराने मनपाच्या दुर्लक्षामुळे अनेक शाळा बंद पडल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बंद पडलेल्या शाळा खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेकरारावर देण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. प्रशासनाकडून हे ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी वारंवार पाठविण्यात आले. मात्र, शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आता मनपा प्रशासनच बंद पडलेल्या शाळा खासगी शैक्षणिक संस्थांना देत आहे. यासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच ठराव मंजूर करण्यात आला.

असा आहे नवीन ठराव
मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी २१ डिसेंबर २०२० रोजी विषय क्रमांक ७३ नुसार मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे या इमारतींची दुरुस्ती वेळेत करण्यात आलेली नाही. या इमारती बंद अवस्थेत आहेत. या सर्व जागा शालेय उपक्रमांसाठीच निर्धारित केलेल्या असल्यामुळे त्या जागांवर शाळा विकसित करणे अनिवार्य आहे. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांसाठी सुनियोजित इमारतीत उच्च प्रतीचे आणि दर्जेदार शिक्षण अल्पदरात मिळावे, हा उद्देश ठेवून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर जागा शालेय उद्देशासाठी शैक्षणिक संस्थांना इमारत बांधणे आणि चालवण्यास देणे.

मनपाच्या बंद पडलेल्या ७ शाळा इमारती :
गीतानगर मनपा शाळा, एन-९ सिडको मनपा शाळा, एन-११ हडको मनपा शाळा, हर्षनगर मनपा शाळा, मोतीकारंजा मनपा शाळा, मॉडेल मिडल स्कूल, गांधीनगर मनपा शाळा, रेल्वे स्टेशन, चेलीपुरा मनपा शाळा.

शाळांसाठी आरक्षित ५ भूखंड :
मनपाने विविध ठिकाणी संपादित केलेल्या शालेय आरक्षणातील भूखंड पीपीपी तत्त्वावर दिले जाणार आहेत. त्यामध्ये गारखेडा न.भू.क्र. ७३५/१/पैकी क्षेत्रफळ ३,६०० चौ.मी. (आरक्षण क्र. २७३), हर्सूल न.भू.क्र. १७२/११, क्षेत्रफळ १८२ चौ.मी. (पी.एस.-३), कांचनवाडी गट क्र. ४७/३ क्षेत्रफळ ४,४५० चौ.मी. (पी.एस.-४), नक्षत्रवाडी गट क्र. १०२ पैकी क्षेत्रफळ ८,८०४.४० चौ.मी. (आरक्षण क्र. १), गारखेडा सर्व्हे नं. ५१/१ (शालेय आरक्षण).

Web Title: Aurangaabad Municipal Corporation approves resolution to give 7 schools, 5 plots to private institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.