औरंगाबादेत ११ टक्के रुग्ण १८ वर्षांखालील, कोरोना प्रतिबंधात्मक लसीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:02 AM2021-04-21T04:02:12+5:302021-04-21T04:02:12+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. औरंगाबादेत एकूण रुग्णांपैकी १०.८४ टक्के म्हणजे साधारण ११ टक्के रुग्ण ...

In Aurangabad, 11 per cent patients under the age of 18 are waiting for corona vaccine | औरंगाबादेत ११ टक्के रुग्ण १८ वर्षांखालील, कोरोना प्रतिबंधात्मक लसीची प्रतीक्षा

औरंगाबादेत ११ टक्के रुग्ण १८ वर्षांखालील, कोरोना प्रतिबंधात्मक लसीची प्रतीक्षा

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. औरंगाबादेत एकूण रुग्णांपैकी १०.८४ टक्के म्हणजे साधारण ११ टक्के रुग्ण हे १८ वर्षांखालील आहेत. परंतु या वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. परिणामी, पालकांची चिंता वाढत आहे.

औरंगाबादेत गेल्या २० दिवसांत ५ बालकांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुलांमधील कोरोनाचे स्वरूप मध्यम स्वरूपाचे होते. परंतु गेल्या काही दिवसांत मुलांमध्येही कोरोनाचे गंभीर स्वरूप पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे गंभीर लक्षणे टाळण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे. परंतु त्यापेक्षा लहान मुलांचे काय, असा सवाल पालकांतून उपस्थित केला जात आहे. या वयोगटातील मुलांना लस मिळण्यासाठी किमान २ ते ३ महिने लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मुलांची काळजी घेण्याचा, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

----------

१८ वर्षांखालचे ७ हजारांवर रुग्ण,

पण लसच उपलब्ध नाही

- औरंगाबादेत आतापर्यंत १८ वर्षांपर्यंतच्या ७ हजार ९७० जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. औरंगाबादेतील एकूण रुग्णांपैकी हे प्रमाण १०.८४ टक्के इतके आहे. यात सर्वाधिक संख्या ही ५ ते १८ वर्षांपर्यंतच्या रुग्णांची आहे.

- शहरात ० ते ५ वर्षांपर्यंतच्या ११५४ बालकांना कोरोनाची बाधा झाली, तर ५ ते १८ या वयोगटात ६८१६ जणांना कोरोनाने गाठले.

- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या दोन्ही वयोगटातील काही बालकांचे मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. अवघ्या २० दिवसांतच ५ बालकांचा मृत्यू झाला.

- ० ते १८ या वयोगटात मृत्यूचे प्रमाण ०.२ ते ०.४ टक्के असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मृत्यूदर कमी असला तरी पहिल्या लाटेपेक्षा आता या वयाेगटातील अधिक मुले बाधित होत आहेत.

-----

१८ ते ५० वर्षामधील ६० टक्के रुग्ण,

१८ वर्षावरील लोकांना लवकरच लस

- औरंगाबादेत १८ ते ५० वर्षांमधील एकूण रुग्णांचे प्रमाण ६०.२० टक्के आहे. आतापर्यंत या वयोगटातील तब्बल ४४ हजार २४९ रुग्ण आढळून आलेले आहेत.

- आतापर्यंत केवळ ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जात होती. परंतु आता १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे आता केवळ ० ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा आहे.

-----

मुलांसाठी लस येत नाही, तोपर्यंत....

० ते १८ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी सध्या ट्रायल सुरू आहे. आगामी काही महिन्यांत या वयोगटासाठीही लस उपलब्ध होण्याची आशा आहे. परंतु तोपर्यंत मुलांची, विशेषत: लहान बालकांची अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

लहान मुलांत काही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मुले घरातच राहतील, याची काळजी घेण्याची गरज आहे. होम आयसोलेशनमध्ये जर कोणी असेल तर त्यांच्यापासून मुलांना दूर ठेवले पाहिजे.

मुले ही सुपर स्प्रेडर असतात. त्यामुळे लस येईपर्यंत काळजी घेतली पाहिजे. मुले घराबाहेर मास्कशिवाय खेळत असतात. पण मुलेही मास्क वापरतील, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे बालरोगतज्ज्ञ डाॅ. रेणू बोराळकर म्हणाल्या.

Web Title: In Aurangabad, 11 per cent patients under the age of 18 are waiting for corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.