coronavirus : औरंगाबाद @ १२४८ ; दिवसभरात ३० नव्या बाधीत रुग्णांची वाढ; दोन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:24 PM2020-05-23T19:24:20+5:302020-05-23T19:25:36+5:30
पहाडसिंगपुरा या नव्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
औरंगाबाद : शनिवारी सकाळी २३ , दुपारी २ आणि सायंकाळी ५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४८ झाली आहे. यातील ५८१ रुग्ण आतापर्यंत उपचार घेवून घरी परतले. तर ६१९ जणांवर उपचार सुरु असून मृतांचा आकडा ४८ झाला आहे.
पहाडसिंगपुरा या नव्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बहुतांश वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी याच परिसरात राहत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. खाजगी रुग्णालयातील एका कर्मचारी बाधित झाला. तर कोरोनामुक्त झालेल्या वडगाव कोल्हाटीत पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
शनिवारी दिवसभरात या भागात आढळले रुग्ण
सादाफ नगर १, रेहमानिया कॉलनी १, महेमूदपुरा १, औरंगपुरा १, एन-८ येथील १, एन-४, गणेश नगर २, ठाकरे नगर ( एन-२ ) २, न्याय नगर ३, बायजीपुरा १, पुंडलिक नगर २, बजरंग चौक ( एन-७ ) ३, एमजीएम परिसर १, एन-५ ( सिडको )१, एन -१२ ( हडको ) १, पहाडसिंगपुरा १, भवानी नगर १, राजाबाजार १, एन ८ ( सुयोग हाऊसिंग सोसायटी ) १, कटकट गेट १, केसापुर १, द्वारकापुरी ( एकनाथनगर ) १, मिसारवाडी १ आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी १ या भागातील ८ महिला आणि २२ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनामुळे दोन वृद्धांचा मृत्यू
किराडपुरा येथील ७५ वर्षीय तर सिटीचौक येथील ७२ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ४८ झाली आहे. किराडपुरा येथील ७५ वर्षीय वृद्धाला १७ मे रोजी भरती करण्यात आले होते. त्यांना कोरोना असल्याचे निदान १८ मे रोजी झाले. शुक्रवारी सकाळी ११.४० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर सिटीचौक येथील ७२ वर्षीय वृद्धाला १९ मे रोजी भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान, शनिवारी सकाळी पाच वाजता त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
मृत्यूची माहिती देण्यास उशिर
खाजगी रुग्णालयातील १८ मे रोजी झालेल्या बाधिताचा मृत्यू शुक्रवारी सांगण्यात आला. तर जिल्हा प्रशासनाकडून बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर २४ तासापेक्षाही अधिक उशिरा माहिती माध्यमांना दिली जात आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.