औरंगाबादेत शाळांच्या १४ बस कालबाह्य असल्याचे तपासणीत आले समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 02:13 PM2018-12-08T14:13:11+5:302018-12-08T14:34:29+5:30
वाळूज रोडवर शाळेच्या बसमधून विद्यार्थी पडून झालेल्या अपघातामुळे आरटीओ कार्यालय जागे झाले
औरंगाबाद : वाळूज रोडवर शाळेच्या बसमधून विद्यार्थी पडून झालेल्या अपघातामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) जागे झाले असून, शुक्रवारी पहाटेपासून शालेय बसची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ४८ वाहने दोषी आढळली, तर १४ वाहने कालबाह्य झाल्याची बाब समोर आली आहे.
आरटीओ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक स्कूल बस आणि रिक्षा ताब्यात घेऊन आरटीओ कार्यालय परिसरात उचलून आणली होती. ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली, त्यांना त्वरित जाता आले. कालबाह्य झालेली १४ वाहने मात्र सोडण्यात आलेली नाहीत. या तपासणीमुळे विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय झाली. अनेकांना स्कूल बसऐवजी खाजगी वाहनाने आणि रिक्षाने प्रवास करावा लागला.
परमिट नसणे, खाजगी वाहनात बदल करणे, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नसणे, कालबाह्य वाहने चालविणे, असे प्रकार शहरातील स्कूल बसबाबत असल्याच्या कारणाने आरटीओ कार्यालयाने हे पाऊल उचलले. बस वाहन मुलांसाठी सोयीचे आणि सुरक्षित आहे की नाही, याची शहानिशा पालकांनीदेखील करावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई
विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर शुकवारी कारवाई केली आहे. चार पथकांनी विविध ठिकाणी ही कारवाई केली.
- स. प्र. मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी