औरंगाबाद @४३ अंश; तापमानाचा ४० वर्षांनंतर जूनमध्ये विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 08:19 PM2019-06-03T20:19:29+5:302019-06-03T20:21:08+5:30
१९७९ मधील तापमानाची बरोबरी
औरंगाबाद : शहराच्या तापमानात अवघ्या एका दिवसात २.३ अंशांनी वाढ होऊन रविवारी कमाल तापमानाने ४३ अंश सेल्सिअस असा जून महिन्यातील उच्चांक गाठला. शहरात १० जून १९७९ इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ४० वर्षांनंतर याच विक्रमी तापमानाची पुन्हा एकदा बरोबरी झाली. काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्यामुळे औरंगाबाद शहर ‘सूर्यबाद’ बनत असल्याची चर्चा नागरिकांत सुरूआहे.
चिकलठाणा वेधशाळेत रविवारी (दि. २) कमाल तापमान ४३.० आणि किमान तापमान २५.० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. शहरात शनिवारी ४०.७ अंश तापमान नोंदविले गेले होते. एकाच दिवसात तापमानात मोठी वाढ झाली. एप्रिल महिन्यानंतर तापमानाने कमाल ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. संपूर्ण मे महिन्यात तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान नोंदविले गेले. १ जून रोजी तापमान चाळिशीवर आले. त्यामुळे नागरिकांना आता उकाड्यापासून दिलासा मिळेल,अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र, अद्यापही सूर्य तळपतच आहे. रविवार खऱ्या अर्थाने ‘सनडे’ ठरला. उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे.
उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पाहायला मिळाला. सायंकाळनंतरही प्रचंड उकाडा होता. जून महिन्यातील विक्रमी तापमानाने औरंगाबादकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हापासून, उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी दुपारी आणि सायंकाळी थंडपेय पिण्यासाठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळाले.
तापमान चाळिशी पुढेच
आगामी आठवडाभर तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करताना नागरिकांना आणखी काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे.