औरंगाबादेत रमजानच्या महिन्यात विकली ५०० किलो मेहंदी आणि अडीज लाख कोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 07:10 PM2018-06-16T19:10:01+5:302018-06-16T19:11:25+5:30
ईदनिमित्त तसेच मागील महिनाभरात शहरात ५०० किलो मेंदी पाऊच व अडीच लाख कोन विकले गेले. सुमारे २० लाख रुपयांची मेंदी ईदच्या दिवशी रंगणार आहे.
औरंगाबाद : रमजान ईदच्या दिवशी लहान मुलींपासून, तर ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वजणी आवर्जून मेंदी लावतातच. ईदनिमित्त तसेच मागील महिनाभरात शहरात ५०० किलो मेंदी पाऊच व अडीच लाख कोन विकले गेले. सुमारे २० लाख रुपयांची मेंदी ईदच्या दिवशी रंगणार आहे.
ईदच्या खरेदीत मेंदीचा आवर्जून समावेश असतो. मेंदी हातावर लावल्याशिवाय शृंगार पूर्ण होऊच शकत नाही. पूर्वी घरी मेंदी आणून तिच्यात पाणी टाकून ती हातावर लावली जात होती. मात्र, आता रेडिमेड कोन बाजारात विक्रीला आल्याने सुट्या मेंदीची विक्री घटली आहे. आता मेंदीही पाऊचमध्ये मिळू लागली आहे. रमजान ईदनिमित्त मागील महिनाभरात शहरात ५०० किलो मेंदीचे पाऊच विक्री झाले. १७० रुपये किलोने ही मेंदी विक्री झाली. सुमारे ८ लाख ५० हजारांपर्यंत ही उलाढाल झाली. बाजारात रेडिमेड कोन आल्याने कोणी सुटी मेंदी घरी आणत नाही. थेट रेडिमेड कोन घेऊन मेंदी हातावर लावली जाते. अवघ्या ५ व १० रुपयांत हे मेंदी कोन विकले जात आहेत.
बाजारात रेडिमेड कोनचे अनेक स्टॉल थाटले आहेत. मेंदीच्या होलसेल विक्रेत्यांनी सांगितले की, ५ रुपयांत एक नग मेंदी कोन विकला गेला. १ लाख ४० हजारपेक्षा अधिक रेडिमेड कोन विकले गेले. यात १२ लाख रुपयांची उलाढाल झाली. मेंदी व्यवसायात एकूण २० लाख रुपयांची उलाढाल झाली.
कोन तयार करण्याचे प्रात्यक्षिक
शहागंज, चेलीपुरा, शहाबाजार रस्त्यावर रेडिमेड मेंदी कोनचे स्टॉल लागले आहेत. तिथे युवक ग्राहकांसमोर रेडिमेड कोन तयार करून देत आहेत. कोन तयार करण्याचे प्रात्यक्षिक बघावयास मिळत आहे. याशिवाय काही मॉलमध्ये तसेच टिळक पथावर मेंदी लावून देणाऱ्या युवकांचे स्टॉलही दिसत आहेत.