औरंगाबाद लोकसभेत ८ उमेदवार दहावी, १० बारावी, ६ पदवीधर आणि ३ पदव्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 07:47 PM2019-04-08T19:47:30+5:302019-04-08T19:48:03+5:30
राजकीय आखाड्यातील शिक्षण : एक उमेदवार अशिक्षित, तर दोन ९ वी उत्तीर्ण
- राम शिनगारे
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल झाल्यानंतर पात्र-अपात्र उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली आहे. एकूण ४२ उमेदवारांनी ६२ अर्ज दाखल केले होते. त्यातील १२ उमेदवारांचे अर्ज विविध त्रुटींमुळे अपात्र ठरविले आहेत. उर्वरित ३० उमेदवारांच्या शिक्षणाचा आढावा घेतला असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
औरंगाबाद लोकसभेसाठी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष, छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी शड्डू ठोकले आहेत. प्रमुख पक्षांच्या बहुतांश उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले आहे. एक उमेदवार पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आहे. एकूण ३० जणांपैकी फक्त एक उमेदवार परदेशी विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण आहे. उर्वरित प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांपैकी एकाच पक्षाचा उमेदवार पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण आहे. राजकारणात उच्चशिक्षितांनी आले पाहिजे, असे बोलले जाते. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास उच्चशिक्षित तयार होत नाहीत.
पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तीन उमेदवारांमध्ये एकाचे शिक्षण पत्रकारितेत, एकाचे व्यवस्थापन शास्त्र आणि एकाचे समाजशास्त्र विषयात एम.ए. झालेले आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रांची ‘लोकमत’ने पडताळणी केली असता ही वस्तुस्थिती समोर आली आहे.
३० पैकी ९ उच्चशिक्षित
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज पात्र ठरलेल्या ३० उमेदवारांपैकी केवळ ९ जण उच्चशिक्षित आहेत. यातील ६ पदवी आणि ३ जण पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. या पदवी घेतलेल्यांमध्ये एकाचे शिक्षण विदेशात झाले. बी.एस्सी आणि एमकॉम प्रत्येकी एक, तीन बीए उत्तीर्ण आहेत. पदव्युत्तरमध्ये एम.ए.एमसीजे, एमबीए आणि एमएचा समावेश आहे.
प्रमुख पक्षांचे उमेदवार अन् शिक्षण
शिवसेना - चंद्रकांत खैरे- आयटीआय, बी.एस्सी.
काँग्रेस - सुभाष झांबड - बी.कॉम. द्वितीय वर्ष
एमआयएम व व्हीबीए - इम्तियाज जलील- एम.ए., एम.सी.जे.
शिवस्वराज्य बहुजन पक्ष- हर्षवर्धन जाधव- बी.ए., डी.बी.ए. (इंग्लंड)
स्वाभिमानी पक्ष- सुभाष पाटील- बी.ए. मुक्त विद्यापीठ, नाशिक
बहुजन समाज पक्ष - जया राजकुंडल- एम.ए. समाजशास्त्र