औरंगाबादमध्ये कचऱ्यावर प्रक्रियेसाठी एजन्सी ठरली; दराबाबत मनपाच्या वाटाघाटी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 06:56 PM2018-07-28T18:56:48+5:302018-07-28T19:00:46+5:30
मागील दोन महिन्यांपासून मनपा प्रशासन निविदाच उघडण्यास तयार नव्हते. चार दिवसांपूर्वी निविदा उघडण्यात आल्या.
औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी निविदा मागविल्या होत्या. शहरातील नऊ झोनमध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी म्हणून विकेंद्रीकरण पद्धतीची निविदा प्रसिद्ध केली होती. मागील दोन महिन्यांपासून मनपा प्रशासन निविदाच उघडण्यास तयार नव्हते. चार दिवसांपूर्वी निविदा उघडण्यात आल्या. स्पर्धेत नागपूर येथील वेस्ट बीन सोल्युशन कंपनीने बाजी मारली. मनपा प्रशासन कंपनीसोबत दरांची वाटाघाटी करीत आहे.
सहा महिन्यांपूर्वी मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा डीपीआर तयार केला. या डीपीआरमध्ये महापालिकेच्या नऊ झोनमध्ये छोट्या-छोट्या मशीन लावून कचऱ्यावर प्रक्रिया करावी, असे नमूद केले. राज्य शासनानेही या डीपीआरला मंजुरी दिली. विकेंद्रीकरण पद्धतीची निविदा काढावी किंवा नाही, या संभ्रमात प्रशासन सापडले होते. कचराकोंडीच्या प्रचंड दबावानंतर आणि न्यायालयालाही आम्ही काही करतोय हे दाखविण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली. पहिल्यांदा एकाच कंपनीने निविदा भरली. दुसऱ्यांदाही तीच अवस्था झाली. तिसऱ्या वेळेस दोन कंपन्यांच्या निविदा आल्या.
मागील दोन महिन्यांपासून मनपा प्रशासन निविदा उघडण्यास तयार नव्हते. अखेर चार दिवसांपूर्वी निविदा उघडण्यास मुहूर्त सापडला. नागपूर येथील वेस्ट बीन सोल्युशन कंपनीने बाजी मारली. निविदा प्रक्रियेनुसार कंपनी नऊ झोनमध्ये मशीन उभी करण्यास तयार आहे. मनपा प्रशासनाचे म्हणणे आहेकी फक्त ३ मशीन तूर्त उभ्या कराव्यात. दररोज एका मशीनवर १६ टन प्रक्रिया करावी. एका टनासाठी मनपा किती पैसे देणार हे अद्याप ठरलेले नाही. दरासाठी वाटाघाटी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रयोग : ...तर इतर ठिकाणी मशीन
तीन मशीनवर कचऱ्यापासून यशस्वीपणे खतनिर्मिती सुरू झाल्यास प्रत्येक झोनमध्ये मशीन लावण्यात येईल. निविदेच्या अटी, शर्तीमध्ये कंपनीने बेलिंग, श्रेडिंग मशीनही लावाव्यात असे म्हटले आहे. कंपनीने एका झोनमध्ये तीन मशीन लावण्याची तयारी दर्शविल्याचे कळते.