औरंगाबादने कोरोनात मुंबई, पुणे, नागपूरलाही मागे टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:02 AM2021-03-26T04:02:27+5:302021-03-26T04:02:27+5:30
औरंगाबाद : औरंगाबादने कोरोनाच्या साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी प्रमाणात मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांनाही मागे टाकले आहे. साप्ताहिक पाॅझिटिव्हिटीत औरंगाबाद राज्यात पहिल्या ...
औरंगाबाद : औरंगाबादने कोरोनाच्या साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी प्रमाणात मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांनाही मागे टाकले आहे. साप्ताहिक पाॅझिटिव्हिटीत औरंगाबाद राज्यात पहिल्या क्रमांकावर गेले आहे. रुग्णवाढीच्या दरातही औरंगाबादने या तिन्ही शहरांना मागे टाकले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
औरंगाबाद जिल्हा सक्रिय रुग्णांमध्ये देशात ६ व्या क्रमांकावर आला आहे. देशासह सक्रिय रुग्णांच्या बाबतीत औरंगाबाद राज्यातही ६ व्या क्रमांकावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन वर्ष लोटले आहे. पण वर्षपूर्तीनंतर त्याचे आव्हान आणखी वेगाने वाढले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रोज एक ते दीड हजारांवर रुग्णांची भर पडत असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ७२ हजारांवर गेली आहे.
औरंगाबाद शहराची मुंबई, पुणे, नागपूर या शहरांशी कायम तुलना केली जात आहे. औरंगाबादने या शहरांना मागे टाकले आहे. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीत औरंगाबाद या शहरांपुढे गेल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. याशिवाय काही बाबी राज्याच्या सरासरीपेक्षा औरंगाबादेत अधिक असल्याचे वास्तव समोर आले आहे. ब्राझीलमधील व्हेरियंटही महाराष्ट्रात आढळला आहे. त्यामुळे औरंगाबादकरांनी अधिक सावध होण्याची गरज आहे.
---
रुग्णवाढीचा दर - साप्ताहिक सरासरी
औरंगाबाद - २.४१ टक्के
नागपूर - १.८७ टक्के
पुणे - १.११ टक्के
मुंबई - ०.८७ टक्के
राज्याची सरासरी - १.०९ टक्के
--------
चाचण्या प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे
औरंगाबाद - १ लाख २६ हजार २६३
राज्याची सरासरी - १ लाख ४१ हजार ८५६
-------
साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी
औरंगाबाद - ४८.२० टक्के
जालना - ३८.०९ टक्के
पुणे - ३३.७२ टक्के
नागपूर - ३२.२० टक्के
नाशिक - ३१.७३ टक्के
मुंबई - १५.१९ टक्के
राज्याची सरासरी - २१.५२ टक्के
----
सक्रिय रुग्णांपैकी गृह अलगीकरणातील रुग्ण
औरंगाबाद - ६३.२० टक्के
राज्याची सरासरी - ५८.५० टक्के
----