विविध पदार्थांच्या अस्सल चवीने औरंगाबादकर तृप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:12 AM2018-01-20T00:12:56+5:302018-01-20T00:13:14+5:30
कोणी कोलकाताच्या पाणीपुरीचा आस्वाद घेत होते, कोणी गुजरातचा व्हाईट ढोकळा खात होते, तर काही जण जोधपुरी मिरची वडा, तर काहींनी पंजाबमधील डॉलर जलेबी विथ रबडीवर ताव मारला. काही खवय्ये तर दक्षिणेतील पायनापल शिºयाची चव चाखत होते. एवढे नव्हे तर अनेक जण असे होते की, ते ग्लोबल स्टॉलवर थाई करी विथ राईस खाण्यात मग्न झाले होते. विविध राज्यांतील खाद्य संस्कृती समृद्ध तेथील ओरिजनल चवीचे पदार्थ चाखण्यास मिळाल्याने पोट व मन तृप्त झाले, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया खाद्यप्रेमींनी व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोणी कोलकाताच्या पाणीपुरीचा आस्वाद घेत होते, कोणी गुजरातचा व्हाईट ढोकळा खात होते, तर काही जण जोधपुरी मिरची वडा, तर काहींनी पंजाबमधील डॉलर जलेबी विथ रबडीवर ताव मारला. काही खवय्ये तर दक्षिणेतील पायनापल शिºयाची चव चाखत होते. एवढे नव्हे तर अनेक जण असे होते की, ते ग्लोबल स्टॉलवर थाई करी विथ राईस खाण्यात मग्न झाले होते. विविध राज्यांतील खाद्य संस्कृती समृद्ध तेथील ओरिजनल चवीचे पदार्थ चाखण्यास मिळाल्याने पोट व मन तृप्त झाले, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया खाद्यप्रेमींनी व्यक्त केल्या.
प्रसंग होता... लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसाचा... शहराच्या हृदयस्थानी असलेल्या क्रांतीचौक येथील हॉटेल मनोरच्या लॉन्सवर भव्य फूड फेस्टिव्हल उभारण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपासून फेस्टिव्हलला सुरुवात झाली. मात्र, खाद्यप्रेमींनी ४.३० वाजेपासून येणे सुरू केले होते. दर्शनी भागात लावण्यात आलेली आकर्षक लायटिंग आणि पाण्याचे झरे सर्वांना मोहित करीत होते. अनेक जण या ठिकाणी थांबून मोबाईल कॅमेºयात हे दृश्य कैद करीत होते. डाव्या बाजूला लावण्यात आलेल्या पाणीपुरीच्या स्टॉलवर खाद्यप्रेमींच्या उड्या पडत होत्या. अंबाला पाणीपुरी, गुजरात पाणीपुरी, मुंबई पाणीपुरी व कोलकाता पाणीपुरी असे प्रकार येथे होते. प्रत्येक पाणीपुरीची चव वेगवेगळी होती. विशेषत: महिला व तरुणींचा ओढा अधिक होता. डाव्या बाजूला वेस्ट स्टॉलमध्ये राजस्थानी ड्रेस परिधान केलेले युवक आलू मटर समोसा, बदाम मूग हलवा, खोबरा पॅटीस, गराडू असे २५ पेक्षा अधिक पदार्थ सर्वांना देत होते. गुजरात चाटच्या स्टॉलवरही गर्दी उसळली होती. नॉर्थ स्टॉलवर पंजाबी पोशाख परिधान केलेले युवक दिल्ली चाट, राय्जमा विथ स्टीम राईस आदी पदार्थ देत होते. डाव्या बाजूस साऊथ स्टॉलवर धोतर नेहरू शर्ट खांद्यावर पंचा असा पारंपरिक पोशाख घातलेले युवक मंच्युरियन, उत्तप्पा, पिझ्झा, इडली असे दाक्षिणात्य खाद्यपदार्थ बनवीत होते. ग्लोबल स्टॉलवर कोट, टाय असा पोशाख घातलेले शेफ खास वेज हक्का नूडल्स, स्पिनॅच ब्रेड, वेज कॅपसीकम पिझ्झा असे एक ना अनेक खाद्यपदार्थ खवय्यांना तयार करून देत होते.
कोणी उंच टेबलावर डिश ठेवून तर कोणी आरामशीर खुर्चीवर बसून विविध पदार्थांचा आस्वाद घेत होते. रात्री ११ वाजेपर्यंत खाद्यप्रेमी या प्रदर्शनात येत होते. फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी शहरवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
आज फेस्टिव्हलचा दुसरा दिवस
तीनदिवसीय लोकमत फेस्टिव्हलचा शनिवारी २० रोजी दुसरा दिवस आहे. सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत फेस्टिव्हल सर्वांसाठी खुले आहे. विशेष म्हणजे येथे हॉटेल मनोरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खाऊगल्लीच्या मैदानावर वाहन पार्किंगची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या फेस्टिव्हलमध्ये खाद्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मनोरंजनाची मेजवानी
४फेस्टिव्हलमध्ये खाद्यपदार्थांसमवेत मनोरंजनाची मेजवानीचा आस्वाद खाद्यप्रेमी घेत आहेत. आज लोककलावंतांनी लावणीपासून ते दांडियापर्यंतचे विविध नृत्य प्रकार सादर करून सर्वांना खिळवून ठेवले, तर व्यावसायिक गायकांनी सदाबहार गीत सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. बच्चेकंपनीसाठी खास खेळण्यासाठी स्वतंत्र विभाग येथे तयार करण्यात आला आहे. तेथील विविध खेळण्यांचा आनंद लहान मुले घेत होते.