औरंगाबाद 'बॅक ऑन ट्रॅक'; लोकमत महामॅरेथॉनची मोठ्या उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 04:51 PM2021-12-12T16:51:04+5:302021-12-12T16:58:34+5:30

अंगाला झोंबणाऱ्या गारव्यावर मात करत औरंगाबादकरांनी मोठ्या जल्लोषात नोंदवला सहभाग.

Aurangabad 'back on track'; Nymber of people participated in Lokmat Maha Marathon | औरंगाबाद 'बॅक ऑन ट्रॅक'; लोकमत महामॅरेथॉनची मोठ्या उत्साहात सांगता

औरंगाबाद 'बॅक ऑन ट्रॅक'; लोकमत महामॅरेथॉनची मोठ्या उत्साहात सांगता

googlenewsNext

औरंगाबाद:लोकमत समूहातर्फे आयोजित व मुख्य प्रायोजक धूत ट्रान्समिशन व पॉवर्ड बाय आयकॉन स्टील प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. औरंगाबादमधील विभागीय क्रीडा संकुलावरुन रविवारी सकाळी सुरू झालेल्या महामॅरेथॉनने औरंगाबादकर पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक आल्याचे दाखवून दिले. 

आज(रविवार)अंगाला झोंबणाऱ्या गारव्यावर मात करत औरंगाबादकरांनी या महामॅराथॉनमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. यावेळी स्पर्धकांसह उपस्थितांचा उत्साह वाढवण्यासाठी शहरात ठिकठीकाणी ढोल-ताशांचा गजर लावण्यात आला होता. याशिवाय, आकाशाला क्षणात विविधरंगांनी व्यापणारी आतषबाजींनी डोळ्यांचे पारणे फेडले. 

या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी सत्तरी पार केलेल्या अजोबांचा गगनाला गवसणी घालणारा आत्मविश्वास आणि तरुण धावपटूंचा उत्स्फूर्त सहभागाला औरंगाबादकरांनी पुष्पवृष्टी करुन दिलेला अपूर्व प्रतिसाद पाहण्याजोगी होता. रविवारी विभागीय क्रीडा संकुलात पार पडलेल्या लोकमत समूह आयोजित खुल्या गटातील २१ कि.मी. स्पर्धेत नाशिकचा दिनकर महाले आणि नागपूरची प्राजक्ता गोडबोले यांनी जिंकली. 

पुरुष गटात दिनकर महाले याने हे अंतर १ तास ११ मि. ५४ सेकंदात पूर्ण केले. महिला गटात विजेतेपदाची दावेदार असणाऱ्या ज्योती गवते हिला पिछाडीवर टाकत नागपूरच्या प्राजक्ता पाटीलने २१ कि. मी.चे अंतर १ तास १८ मि. २२ सेकंदात पूर्ण करीत अव्वल स्थानावर कब्जा केला. डिफेन्स गटात प्रल्हाद धनावत याने पुरुष तर महिला गटात योगिता वाघने बाजी मारली.

यावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या संस्थापिका आशू दर्डा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आ. संजय शिरसाठ, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मलिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक निमित गोयल, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापक संचालिका रुचिरा दर्डा, शीतल दर्डा, क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे, रेस डायरेक्टर संजय पाटील यांच्या उपस्थितीत औरंगाबादकरांची उत्सुकता शिगेला वाढवणाऱ्या लोकमत समूह आयोजित महामॅरेथॉन अमाप उत्साहात रविवारी पार पडली. गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या या महमॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिक, धावपटूंच्या अंगात अपूर्व उत्साह संचारलेला होता. तुताऱ्या, फुंकल्या जात होत्या. 

पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी सुरुवात झाली.

धावण्यासाठी असलेल्या पोषक वातावरणामुळे सहभागी नागरिक, धावपटूंत एक नवचैतन्य संचारले होते. पुरुष गटातील खुल्या गटात नाशिकच्या दिनकर महाले व नंदुरबारच्या भगतसिंग यांच्यात चांगलीच चुरस होती. मात्र, चौथ्या पर्वातही बाजी मारणाऱ्या दिनकर महालेने आपला वेग वाढवत अव्वल स्थानावर कब्जा केला. दुसऱ्या स्थानी आलेल्या नंदुरबारच्या भगतसिंगने १ तास १३ मि. ७ सेकंद वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबादचा रामेश्वर मुंजाळने १ तास १३ मि. ५० सेकंद वेळ नोंदवत कब्जा केला.

खुल्या गटात महिला गटातील २१ कि. मी. अर्धमॅरेथॉनमध्ये प्राजक्ता गोडबोलेने धक्कादायक निकालाची नोंद करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू परभणीच्या ज्योती गवतेला पाठीमागे टाकले. २१ कि. मी. रेस होण्याआधी लोणावळा येथे टाटा अल्ट्रा मॅरेथॉन ही ५० कि. मी. अंतराची रेस जिंकणाऱ्या ज्योती गवते हिच्या अनुभवामुळे थोडे तिच्यावर थोडे दडपण होते. रेस सुरुवात झाल्यानंतर अनुभवी ज्योतीला मागे टाकत २०१९ साली इटलीतील नापोली येथे जागतिक विद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने अव्वल स्थान पटकावले. ज्योती गवतेने १ तास २४ मि. ५९ सेकंद वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. उस्मानाबादची योगिनी साळुंकेने १ तास ३० मि. ५० सेकंद वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले.

डिफेन्स गटात औरंगाबाद जिल्ह्यातील बेंदेवाडी येथील प्रल्हा धनावत याने वर्चस्व राखले. जबलपूर येथे सैन्यदलात हवालदार असणाऱ्या आणि याआधी ४९ अर्धमॅरेथॉनमध्ये ठसा उमटवणाऱ्या प्रल्हाद धनावत याने प्रथमच औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवताना १ तास ७ मि. ५० सेकंद वेळ नोंदवताना अव्वल स्थान पटकावले. आता तो पुढील महिन्यात जानेवारी महिन्यात बांगलादेश फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. दुसऱ्या स्थान सुनील कुमारने तर अम्बुज तिवारीने तिसरे स्थान पटकावले. महिला गटात योगिता सोनू वाघने अव्वल, अश्विनी देवरेने दुसरे स्थान पटकावले. रितिका कौरानी हिने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.

पोलिसांनी वाहतुकीचे केले योग्य नियोजन
लोकमत महामॅरेथॉनला सुरुवात झाल्यापासून संपेपर्यंत शहर पोलिसांनी वाहतुकीचे काटेकोर नियोजन केले होते. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग दिल्यामुळे धवापटूना कोणताही अडथळा न होता सर्व काही सुरळीतपणे पार पडले. यात पोलीस विभागाने महत्वाची भूमिका निभावली. यादरम्यान, वाहनधारक किंवा पादचाऱ्यांना कुठेही अडचण झाली नाही. धावपटू धावताना देशभक्तीपर गीते आणि ढोल ताशांच्या गजराने धावपट्टूंचा उत्साह वाढविला जात होता.

निकाल

खुला गट (पुरुष) : २१ कि. मी. : १. दिनकर महाले (नाशिक), २. भगतसिंग वळवी (नंदुरबार), ३. रामेश्वर मुंजाळ (औरंगाबाद).
खुला गट (महिला) : २१ कि. मी. : १. प्राजक्ता गोडबोले (नागपूर) , २. ज्योती गवते (परभणी), ३. योगिनी साळुंके (उस्मानाबाद).

डिफेन्स गट (पुरुष) : २१ कि. मी. : १. प्रल्हाद धनावत, २. सुनील कुमार, ३. अम्बुज तिवारी.
डिफेन्स गट (पुरुष) : २१ कि. मी. : १. योगिता सोनु वाघ, २. अश्विनी देवरे, ३. रितिका कौरानी

व्हेटरन्स गट (पुरुष) : २१ कि. मी. : १. भास्कर कांबळे, २. दत्तात्रय जायभाय, ३. कैलाश माने.
व्हेटरन्स गट (महिला) : २१ कि. मी. : १. शोभा यादव, २. माधुरी निमजे, ३. प्रणिता खैरनार.

१० कि. मी. (पुरुष खुला गट) : १. दयानंद चौधरी, २. अतुल बर्डे, ३. अविनाश पटेल.
१० कि. मी. (महिला खुला गट) : १. अश्विनी जाधव, २. गायत्री गायकवाड, ३. पूजा श्रीडोळे.

१० कि. मी. (पुरुष व्हेटरन्स गट) : १. रणजीत कनबरकर, २. रमेश चिवलीकर, ३. समीर कोल्या,
१० कि. मी. (महिला व्हेटरन्स गट) : १. डॉ. इंदु टंडन, २. प्रतिभा नाडकर, ३. लोपमुद्रा कार.

Web Title: Aurangabad 'back on track'; Nymber of people participated in Lokmat Maha Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.