औरंगाबादेतील ए एस क्लब-साजापूर चौफुली रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:07 PM2018-11-20T18:07:48+5:302018-11-20T18:07:59+5:30
वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील ए एस क्लब ते साजापूर चौफुली रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप ए एस क्लब ते साजापूर चौकाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनाधारकांची गैरसोय होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

दहा वर्षांपूर्वी मुंबई-नागपूर महामार्गाचे काम करण्यात आले आहे. सध्या या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उखडल्याने जागो जागी खड्डे पडले आहेत. साईड पंख्याचीही दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपासून तर अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेला असून, अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत. खडड््यामुळे ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.
तुकडे पाडून रस्त्याचे काम...
महामार्गाची दुरावस्था व वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून लासूर ते ए एस क्लब लिंक रोड रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ६ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचे १९ सप्टेंबरला आ. प्रशांत बंब यांच्या हस्ते उद्घाटनही झाले आहे. मात्र, रस्त्याचे तुकडे पाडून काम केले जात असल्याने साजापूर चौफुली ते ए एस क्लब लिंक रोड चौक रस्त्याचे काम लांबणीवर पडले असून हे काम प्रत्यक्षात केव्हा सुरु होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रस्त्याचे काम लवकर करावे ..
रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने रस्त्याचे काम हाती घेवून लवकर पूर्ण करावे, असे तीसगावचे ग्रा.पं. सदस्य संजय जाधव यांनी सांगितले.