औरंगाबादमधील लढत होणार तिरंगी, चौरंगी की पंचरंगी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 01:53 AM2019-03-28T01:53:53+5:302019-03-28T01:54:11+5:30

काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम अशा तिरंगी लढतीचे चित्र सध्या तरी औरंगाबाद मतदारसंघात दिसते. हर्षवर्धन जाधव आणि अब्दुल सत्तार हे दोन आमदार येत्या दोन दिवसांत काय निर्णय घेतात यावरुन ही लढत तिरंगी की पंचरंगी हे निश्चित होईल.

Aurangabad to be held in Triangi, Chowringhee Pancharangi? | औरंगाबादमधील लढत होणार तिरंगी, चौरंगी की पंचरंगी?

औरंगाबादमधील लढत होणार तिरंगी, चौरंगी की पंचरंगी?

googlenewsNext

- नजीर शेख

औरंगाबाद : काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम अशा तिरंगी लढतीचे चित्र सध्या तरी औरंगाबाद मतदारसंघात दिसते. हर्षवर्धन जाधव आणि अब्दुल सत्तार हे दोन आमदार येत्या दोन दिवसांत काय निर्णय घेतात यावरुन ही लढत तिरंगी की पंचरंगी हे निश्चित होईल. एमआयएमच्या निर्णयाने या मतदारसंघाची समीकरणे कशी बदलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने आ. सुभाष झांबड यांना मैदानात उतरविले आहे. सोमवारी रात्री एमआयएमने आ. जलील यांची उमेदवारी जाहीर केली. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही आपल्या शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे उमेदवारी दाखल करण्याचे घोषित केले आहे. याशिवाय आ. झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज असलेले आ. अब्दुल सत्तार यांनीही अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आ. जाधव आणि आ. सत्तार उभे राहिल्यास मतदारसंघात पंचरंगी लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे.
खैरेंविरुद्धच्या मागील चार लढतींमध्ये काँग्रेसने प्रत्येक वेळी नवा उमेदवार दिला आहे. यापूर्वी चार वेळा दिवंगत नेते बॅ. ए.आर. अंतुले, रामकृष्णबाबा पाटील, उत्तमसिंग पवार आणि नितीन पाटील यांना उमेदवारी दिली. आता आ. झांबड उभे ठाकले आहेत.
या मागील चार निवडणुकांतील अपयशषनंतरही काँग्रेस पक्षाकडून ही जागा जिंकण्याबाबत व्यूहरचना होत आहे, असे चित्र दिसत नाही. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना २०१४ मध्ये निवडून आल्यानंतरच २०१९ मध्येही आपल्यालाच लढायचे आहे, याची खात्री होती. काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या वर्षभर आधी उमेदवारांची चाचपणी आणि चर्चा सुरू होऊन अनेक इच्छुकांपैकी शेवटी एकाला उमेदवारी मिळत असल्याचे चित्र आहे. मग अनेक जण नाराजीचा सूर लावतात. काँग्रेसच्या या निर्णयप्रकियेचा अर्थातच शिवसेनेला अधिक फायदा होताना दिसतो. यंदाही आ. झांबड यांची उमेदवारी घोषित होताना आ. सत्तार यांनी बंडाची भाषा केलीच. आता वंचित आघाडीकडून आ. जलील यांची उमेदवारी घोषित झाल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे. राष्टÑवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेले आ. सतीश चव्हाण मंगळवारच्या दोन्ही पक्षांच्या एकत्रित मेळाव्याला गैरहजर होते. त्यामुळे त्यांची आ. झांबड यांना किती साथ मिळते, हेही पाहावे लागेल.
सद्य:स्थितीत औरंगाबाद मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम हे तीन पक्ष मैदानात असणार आहेत, हे स्पष्ट होत आहे. शिवसेना आणि काँग्रेसने प्रचाराला सुरुवातदेखील केली आहे. अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली नाही. आ. जाधव आणि आ. सत्तार उमेदवारी अर्ज भरतात की नाही आणि दाखल केलेली उमेदवारी परत घेतात की नाही, यावर मतदारसंघात तिरंगी, चौरंगी की पंचरंगी लढत होणार हे स्पष्ट होईल.

निवडणुकीच्या आधीपासून आ. हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंवर शरसंधान करीत आपली उमेदवारी आधीच घोषित केली आहे. ते ३० एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत. खैरेंचा विरोध हाच एकमेव निकष त्यांच्या उमेदवारीमागे आहे. दुसरीकडे आ. सत्तार यांनी जाहीर केलेली बंडखोरी किती दिवस राहते, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.
एमआयएमचे आ. जलील यांच्या उमेदवारीला औरंगाबादेतील उच्चशिक्षित मुस्लिम आणि मौलानांनी काही दिवसांपूर्वी विरोध दर्शविल्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीत नसणार हे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, सोमवारी रात्री पुन्हा त्यांची उमेदवारी जाहीर केली गेली.
देशातून भाजपचे सरकार
हद्दपार व्हावे, असे वाटणारा मुस्लिम वर्ग आता एमआयएमच्या उमेदवारीकडे कसे पाहतो,
हेही महत्त्वाचे ठरणार आहे. एमआयएमच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होईल, या आरोपाचा आ. जलील यांनी इन्कार करीत आम्ही
नव्हतो तेव्हाही काँग्रेसचा
पराभव होत होता, असे
स्पष्ट केले आहे.
मागील चार निवडणुकांमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसलेली आहे. खा. खैरे यांच्याबाबतीत निवडणुकीच्या आधी विरोधी वातावरण असल्याचे चित्र निर्माण तयार होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत ते विजयी होत आल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Aurangabad to be held in Triangi, Chowringhee Pancharangi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.