ज्युदो प्रिमिअर लिग स्पर्धेत औरंगाबादची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 08:36 PM2019-07-04T20:36:20+5:302019-07-04T20:37:14+5:30
ज्युदो प्रिमिअर लिग स्पर्धेत औरंगाबादच्या हरिहर हंटर्स संघाने सांघिक विजेतेपद पटकावले आहे.
वाळूज महानगर : आयपीएल टी-२० व प्रो कबड्डी स्पर्धेच्या धर्तीवर पहिल्यांदाच नाशिक येथे झालेल्या ज्युदो प्रिमिअर लिग स्पर्धेत औरंगाबादच्या हरिहर हंटर्स संघाने सांघिक विजेतेपद पटकावले आहे.
महाराष्ट्र ज्युदो संघटनेंतर्गत नाशिक जिल्हा ज्युदो संघटना व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी स्टेडिअम सभागृहात ३० जून रोजी ज्युदो प्रिमीअर लिग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या राज्यातील ९ संघांनी सहभाग घेतला.
सनी हाके यांच्या औरंगाबादच्या हरिहर हंटर्स संघाने अंतिम फेरीत शिवनेरी किंग्ज संघावर विजय मिळवून विजेतेपदाला गवसणी घातली. हरिहर हंटर्स संघाकडून योगेश मोरे, सचिन पाटील, गणेश चोरगे, अंकित सोनवणे, हर्षल थिटे, श्रेया दळवी, प्रेक्षा शहा, महिमा गाडीलोहार, काजल औताडे या खेळाडूंनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला रोख रक्कम व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. विजेत्या संघाचे राज्य संघटनेचे सरचिटणीस दत्ता आफळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, अशोक जंगमे, भिमराज शहाणे, विजय दिमाण, साईचे डॉ. व्ही.के. शर्मा, सचिन वाहुळकर, कुणाल गायकवाड आदींनी स्वागत केले आहे.