शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 03:22 PM2022-10-18T15:22:20+5:302022-10-18T15:24:00+5:30
न्या. संभाजी शिंदे (राजस्थान उच्च न्यायालय), न्या. प्रसन्न वराळे (कर्नाटक उच्च न्यायालय) आणि न्या. नरेश पाटील (मुंबई उच्च न्यायालय) हे तीन मुख्य न्यायमूर्ती औरंगाबाद खंडपीठाने तीन राज्यांना दिले आहेत
- प्रभुदास पाटोळे
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्न भालचंद्र वराळे यांना शनिवारी कर्नाटकचे राज्यपाल थवरचंद गहलोत यांनी बंगळुरू येथे राजभवनात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ दिली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी न्या. वराळे यांचे अभिनंदन केले.
मूळचे औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे सदस्य असलेले आणि येथेच वकिली केल्यावर व सरकारी वकील म्हणून सेवा बजावल्यानंतर येथूनच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान होऊन मुख्य न्यायमूर्तीपदापर्यंत पोहोचलेले न्या. वराळे हे तिसरे न्यायमूर्ती ठरले आहेत. त्यामुळे मागील ४ वर्षांत तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती’ देऊन औरंगाबाद वकील संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. खंडपीठ वकील संघातून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान झालेले न्या. नरेश पाटील यांनी २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी २०२२ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. इतकेच नव्हे तर आतापर्यंत वकिलांमधून १८ न्यायमूर्ती व ९ ज्येष्ठ विधिज्ज्ञ बनले आहेत.
मुख्य न्या. वराळे यांच्या शपथविधी सोहळ्यास औरंगाबाद खंडपीठातील न्या. रवींद्र घुगे, न्या. आर.जी. अवचट, न्या. श्रीकांत कुलकर्णी, न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. किशोर संत, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी, सचिव ॲड. सुहास उरगुंडे, ज्येष्ठ विधिज्ज्ञ राजेंद्र देशमुख, मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे, ॲड. अतुल कराड, ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे, ॲड. बालाजी येणगे, ॲड. संभाजी टोपे, ॲड. शहाजी घाटोळ पाटील, ॲड. अमरजितसिंह गिरासे आदी वकील तसेच मुंबई मुख्य पीठ, नागपूर आणि गोवा खंडपीठातील न्यायमूर्ती आणि वकील उपस्थित होते.