राजीव खेडकर यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे खंडपीठाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:21 PM2018-10-18T13:21:23+5:302018-10-18T13:21:42+5:30
अवमान याचिकेच्या सुनावणीवेळी अनुपस्थित राहत असलेले संस्थेचे सचिव राजीव खेडकर यांना आगामी २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दिले.
औरंगाबाद : भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भगवान औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सहावा वेतन आयोग मिळावा, यासाठी दाखल केलेल्या अवमान याचिकेच्या सुनावणीवेळी अनुपस्थित राहत असलेले संस्थेचे सचिव राजीव खेडकर यांना आगामी २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दिले.
भगवान औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात कार्यरत सात प्राध्यापकांनी सहावा वेतन आयोग देण्याच्या मागणीसाठी जून २०१३ मध्ये खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात खंडपीठाने १५ जानेवारी २०१८ रोजी सात कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००६ पासून सहावा वेतन आयोग आणि फरकाची रक्कम देण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाला संस्थेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमतीद्वारे आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने संस्थेची याचिका ९ मे २०१८ रोजी फेटाळली.
यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असतानाही त्याकडे संस्थेने दुर्लक्ष केले. यामुळे कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात १६ एप्रिल २०१८ रोजी अवमान याचिका दाखल केली. या याचिकेत सर्व संबंधितांना न्यायालयाने नोटीस पाठवून उत्तर देण्यास बजावले. यानुसार राज्याचे उच्च शिक्षण सचिव, तंत्रशिक्षण सहसंचालक, एआयसीटीईचे अध्यक्ष आदी हजर झाले. मात्र खेडकर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब याचिकाकर्त्यांचे वकील पुष्कर शेंदुर्णीकर यांनी १२ आॅक्टोबर रोजीच्या सुनावणीवेळी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. तेव्हा न्यायालयाने खेडकर यांनी उपस्थित राहण्याचे आदेश दिले.