औरंगाबाद शहराचे सार्वजनिक वाहतुकीचे कंबरडे मोडले; धावतात अवघ्या १७ सिटी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:35 IST2018-05-07T16:34:18+5:302018-05-07T16:35:25+5:30
शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद शहराचे सार्वजनिक वाहतुकीचे कंबरडे मोडले; धावतात अवघ्या १७ सिटी बस
औरंगाबाद : शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
शहर बससेवा चालविताना गेल्या पाच वर्षांत एस. टी. महामंडळाला झालेला तोटा १६ कोटींवर गेला आहे. शहर बससेवा चालविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे शहर बससेवा चालविताना होणाऱ्या नुकसानीची भरपाई मनपाने करावी, अन्यथा शहर बससेवा बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना कळविले होते. प्रारंभी नोव्हेंबर २०१६ मध्ये शहर बससेवेपोटी झालेल्या नुकसानीची रक्कम देण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली. यानंतरही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु महापालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही.
या सगळ्यात शहरात अवघ्या २५ ते ३० शहर बस चालविण्यावर भर देण्यात आला. यामध्येही आता कपात करून काही शहर बस थेट शहराबाहेर चालविण्यात येत आहेत. सध्या केवळ १७ शहर बस सुरू आहेत. यास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. त्यामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांना शहर बसची नुसती प्रतीक्षा करावी लागते. यातून प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शहर बसच्या अपुऱ्या संख्येमुळे नाईलाजाने आर्थिक भुर्दंड सहन करून रिक्षाने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.