औरंगाबाद : बुद्ध जयंती शोभायात्रेने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:27 AM2018-05-01T00:27:41+5:302018-05-01T00:29:01+5:30
बुद्ध जयंतीनिमित्त आज शहरात सकाळी आणि सायंकाळी अशा दोन शोभायात्रा काढण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बुद्ध जयंतीनिमित्त आज शहरात सकाळी आणि सायंकाळी अशा दोन शोभायात्रा काढण्यात आल्या.
सकाळी भडकलगेट येथून ही शोभायात्रा निघाली. भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली निघालेली ही शोभायात्रा सिद्धार्थ उद्यानात पोहोचली व तेथे भन्ते अश्वजित व भन्ते बुद्धरत्न यांच्या हस्ते दीक्षार्र्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी ध्वजारोहण करण्यात आले व दुपारी १ ते ५ यावेळेत धम्मदेसनेचा कार्यक्रम झाला. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे-बौद्ध, किशोर जोहरे, विलास पठारे, एस. टी. काळे, डी. आर. सरदार, ज्ञानोबा घोडके, प्रमोद पवार यांनी या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सायंकाळी अ. भा. भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौक येथून बुद्ध जयंतीची शोभायात्रा काढण्यात आली. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते या शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौकमार्गे भडकलगेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ही शोभायात्रा विसर्जित झाली. भारतीय बौद्ध महासभेनेही या शोभायात्रेत सहभाग घेतला. वाटेत नागसेन मित्रमंडळाने पाणी व केळी वाटप केली. श्रामणेर व पांढऱ्या गणवेशातील उपासक- उपासिकांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो, भन्ते चंद्रबोधी, भन्ते सुगतबोधी आदींनी या शोभायात्रेचे नेतृत्व केले.
काँग्रेस अनुसूचित जाती विभाग
काँग्रेसच्या अनुसूचित विभागातर्फे सिद्धार्थ उद्यानात तथागतांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष बाबा तायडे, उत्तम दणके, सुनील साळवे, रॉबिन बत्तीसे, भिकाजी खोतकर, कृष्णा राऊत, अशोक चक्रे, अॅड. क्षितिज रोडे, माया बागूल, संजीवनी महापुरे, अलका चक्रे , शकुंतला साळवे, सुभाष पटेकर, राहुल भालेराव, सम्राट वानखेडे, भूषण गवई, अरुण नंदागवळी, प्रभाकर साळवे, अविनाश साळवे आदींची उपस्थिती होती.
बोधीवृक्षांचे वाटप
टीव्ही सेंटर चौकात सिडको- हडको डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासंघाच्या वतीने बोधीवृक्षांचे वाटप करण्यात आले. प्रा. राजेश पाटील व पंडित बोर्डे यांनी याकामी पुढाकार घेतला. यानिमित्त टीव्ही सेंटर चौकात भव्य बुद्धपीठ उभारण्यात आले होते. सकाळी तेथे उपासक-उपासिकांनी बुद्धवंदना म्हटली.