औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात पोलिसांना परगावांतील चोरट्यांचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:32 IST2018-07-18T16:31:46+5:302018-07-18T16:32:32+5:30
परगावांहून येणाऱ्या चोरट्यांमुळे घटना थांबत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान ठरत आहे.

औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात पोलिसांना परगावांतील चोरट्यांचे आव्हान
औरंगाबाद : गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल, दागिने लांबविणे, खिसे रिकामे करण्यासह इतर अनुचित प्रकार ९० टक्के बंद झाले आहेत. संपूर्ण स्थानक परिसरात सीसीटीव्हीची निगराणी असल्याने अनुचित प्रकार कमी झाले आहेत. मात्र, परगावांहून येणाऱ्या चोरट्यांमुळे घटना थांबत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान ठरत आहे.
सुट्यांचा काळ किंवा सण-उत्सवांचा कालावधी या कळात प्रवाशांची बसस्थानकांवर प्रचंड गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांचे सोन्याचे दागिने, मोबाईल लांबविणे, पाकीटमारी करणारे भुरटे चोर याचवेळी कार्यरत असतात. वेळीच प्रवाशाच्या लक्षात आले तर पोलिसांत तक्रार दिली जाते; अन्यथा उशिरा कळल्यास संबंधित प्रवासी तक्रार देण्याबाबत फारसे उत्सुक नसतात. यावर तोडगा म्हणून पोलीस प्रशासनाने जवळपास तीन वर्षांपूर्वी सीसीटीव्ही बसविले होते; पण याचा दर्जा आणि चित्र सुस्पष्टता नसल्याने याचा फारसा उपयोग होत नव्हता.
अखेर पोलीस प्रशासनाने उच्च दर्जाचे सीसीटीव्ही स्थानक व परिसरात बसविण्याची विनंती एसटी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार एप्रिल २०१८ मध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले. गत तीन ते चार महिन्यांत पाकीटमारी, सोन्याचे दागिने वा मोबाईल लांबविण्याचे प्रकार ९० टक्के कमी झाले आहेत. सध्या संपूर्ण बसस्थानक आणि आगार हा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून, गत तीन महिन्यांत अनुचित प्रकार जवळपास बंद झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
येथे बसविले सीसीटीव्ही
बसस्थानकप्रमुख, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आणि स्थानकात, कर्मचाऱ्यांचे विश्रामगृह, रोखपाल, स्थानकाचे दोन्ही प्रवेशद्वार, शौचालय परिसर आदी भागांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परगावांहून मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश करायचा आणि आपला कार्यभाग उरकून गावाकडे परत जायचे, असे करण्यात काही चोरटे सध्या सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी पाकीटमारी करणाऱ्या धुळ्याच्या एका चोरट्यास पकडल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. परगावचे चोरटे चोरी करून गावाकडे जात असल्याने तपासाचे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे.
गुन्हे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न
पूर्वी दिवसाला सहा ते सात पाकीटमारी, दागिने, मोबाईल चोरीची प्रकरणे घडत असत. उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसविल्याने घडामोडींवर लक्ष राहते. यामुळे सध्या एक वा दोनच गुन्हे घडत आहेत. तेही आटोक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- संदीप मोरे, हेकॉ., मध्यवर्ती बसस्थानक, औरंगाबाद