औरंगाबाद ‘मध्य’ मतदारसंघात मतविभाजनावर विजयाचे गणित; चौरंगी लढत होणार हे निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 01:24 PM2024-11-05T13:24:13+5:302024-11-05T13:25:14+5:30
कोण कोणाची किती मते घेईल, यावर एका उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. आता चौरंगी लढत होणार हे निश्चित. हिंदूबहुल भागात शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल विरुद्ध उद्धवसेनेचे पर्यायी उमेदवार बाळासाहेब थोरात अशी लढत पाहायला मिळेल. मुस्लीमबहुल भागात एमआयएमचे नासेर सिद्दिकी विरुद्ध वंचितचे जावेद कुरैशी अशी लढत रंगणार आहे. कोण कोणाची किती मते घेईल, यावर एका उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
२०१९ मध्ये शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल विरुद्ध एमआयएमचे नासेर सिद्दिकी अशी सरळ लढत झाली होती. यंदाही याच दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. उद्धवसेनेने किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. उद्धवसेनेवर आजपर्यंत अशी नामुष्की कधीच ओढावली नव्हती. त्यामुळे प्रदीप जैस्वाल यांचा मोठा राजकीय अडथळा दूर झाला आहे. उद्धवसेनेचे पर्यायी उमेदवार हिंदू मतांचे विभाजन किती करतील यावर जैस्वाल यांच्या विजयाचे गणित ठरणार आहे. अशीच परिस्थिती मुस्लीमबहुल भागात पाहायला मिळतेय. एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दिकी यांच्यासमोर वंचितचे जावेद कुरैशी आहेत. कुरैशी यांचा मुस्लीम आणि दलित मतांवर डोळा आहे. ते किती मते घेतील यावर सिद्दिकी यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. या मतदारसंघात मनसेचे सुहास दाशरथे, उद्धवसेनेचे बंडखोर बंडू ओक हेसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत.
मराठा फॅक्टर कोणाच्या बाजूने?
या मतदारसंघात मनोज जरांगे फॅक्टरचा विचार केला तर मराठा मतदान कोणाकडे जाईल, यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर संदीपान भुमरे यांच्या बाजूने होता. विधानसभेला काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.