४० टक्क्यांहून अधिक मते घेणारा ठरेल औरंगाबाद 'मध्य'चा विजेता; उमेदवारांचा कस लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 07:15 PM2024-11-07T19:15:05+5:302024-11-07T19:18:36+5:30
२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात निवडून येण्यासाठी किमान ४० टक्क्यांहून अधिक मतदान उमेदवाराला घ्यावेच लागते. मागील दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास झालेल्या मतदानापैकी ४० ते ४२ टक्के मतांची गरज विजयासाठी असते. कोणत्याही एका बाजूला मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले, तर ३२ टक्के मते घेऊनही उमेदवार निवडून आल्याचा या मतदारसंघाचा इतिहास आहे.
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्य मतदारसंघात २ लाख ८६ हजार मतदान होते. मतदानाच्या दिवशी १ लाख ८८ हजार ४६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील वैध मतांची संख्या १ लाख ८७ हजार ६३६ होती. ६५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत तनवाणी यांना २१.८, तर जैस्वाल यांना २२.२ टक्के मतदान मिळाले. या दोघांच्या मतांची एकूण टक्केवारी ४३.८ होते. मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला. इम्तियाज जलील अवघ्या ३२ टक्के मतांवर निवडून आले होते.
२०१९ ची स्थिती
२०१९ मध्ये एमआयएम विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. यावेळी मतदान ३ लाख १९ हजार ७४४ होते. प्रत्यक्षात १ लाख ९३ हजार १५५ मतदान झाले. टक्केवारी ६०.८ होती. निकालाच्या दिवशी जैस्वाल यांना ४२.६ टक्के, तर एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना ३५.४ टक्के मतदान झाले होते.
आताचे चित्र असे :
२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल. निवडून येण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला किमान ४० टक्के म्हणजेच ८७ हजार ८५३ मतदान घ्यावे लागेल. मतदारसंघात लढत शिंदेसेना विरुद्ध एमआयएम अशीच होईल. हिंदू बहुल भागात उद्धवसेनेचे उमेदवार आणि मुस्लिम बहुल भागात वंचितचे उमेदवार किती मतदान घेतील यावर बरेच काही अवलंबून असेल.